आसूपालव -अशोक- [ Polyalthia longifolia

मागच्या लेखात मी सीतेच्या अशोकाबद्दल लिहिलं होतं. लेखाच्या शेवटी लिहिल्याप्रमाणे, अर्थातच आजचा लेख खोटा अशोक किंवा आसूपालव या नेहेमीच्या पहाण्यातल्या अशोकाबद्दल लिहितेय . बहुतांश लोकं याच झाडाला खरा अशोक समजतात. आपल्या पहाण्यात असलेल्या नेहेमीच्या अशोकाबद्दल आजच्या गप्पा.

ashoka2ashoka 1

खोटा अशोक म्हणजे मास्ट ट्री. याला मराठीत आसूपालव असपण म्हणतात.ज्यांना खरा अशोक माहीत आहे ते लोकं याला खोटा अशोक, पान अशोक असही म्हणतात. याच कारण अगदी सोप्पं आहे. याच्या आणि सीतेच्या अशोकाच्या पानांमधे इतकं साम्य असतं की बर्याच जणांना फ़सायला होतं. गम्मत म्हणजे मागच्या लेखात लिहिलं गेलेलं झाड अगदी १००% भारतिय आहे आणि हा खोटा अशोक भारतिय नाही….. आपल्या शेजारच्या देशातून आपल्या मातीत रूजलेलं हे झाड कुणाला सांगूनही परकं वाटत नाही. श्रीलंकेतून आपल्याकडे आलेल्या हे झाड अगदी आपलंच होवून गेलाय . सीतेच्या अशोकाची झाडाची फ़्यामिली म्हणजेच कुळ वेगळ नी ह्याच कुळ वेगळ आहे. सिताफ़ळ, रामफ़ळ यांच्या ’अनोनसी कुटुंबात’ [ Annonaceae ] ह्या आसूपालव झाडाचा समावेश होतो. पॉलीऎलथिया लोंगिफ़ोलिया [ Polyalthia longifolia ] हे लटांबर वाटावं असं शास्त्रिय नाव याला आहे.या झाडाच्या शास्त्रिय नावात खुप अर्थ आहे. पॉलीऎलथिया म्हणजे ज्याच्यात अनेक औषधी गुणधर्म आहे असां नी लोंगिफ़ोलिया म्हणजे ज्याची पानं लांब लांब वाढतात असं झाड. कित्ती सुंदर नाव आहे नाही? पण आपल्याला या झाडाचे औषधी गुणधर्म माहित नाहीत म्हणुन त्याचा वापर आपल्याकडच्या कुठल्याच औषधात केला जात नाही. या झाडाच्या लांब लांब लाकडाचा वापर पुर्वी शिडाच्या होडीची डोलकाठी बनवायला वापरायचे म्हणुन मास्ट ट्री अस पण नाव याला मिळालं. बाकी या लाकडाचा वापर मोठ्या लाकूडकामासाठी केला जात नाही.

ashoka4

लेख लिहिता असताना ,मला माझ्या माहेरच्या जुन्या घराची आठवण झाली. शेजारच्या वाड्यात दोन मोठे अशोक आणि एक निलगिरीचं उंचच उंच झाड होतं. तिघांचीही पान खुप पडायची नी आम्ही मुलं ती पानं गोळा करून शेकोटी करायचो. या आसूपालव अशोकाची अजून एक उपजात आपल्याकडे पहायला मिळेते जी सरळ तर वाढतेच पण खाली झुकलेल्या फ़ांद्यांची असते जिला ड्रुपिंग अशोक असे म्हणतात. म्हणुन रस्त्याच्या कडेला, शासकिय इमारतींच्या सुशोभिकरणासाठी, बागांमधे ही झाडं खुप लावतात.

ashoka9ashoka6

उन्हाळ्यात जेव्हा हे झाड फ़ुलण्याचा हंगाम असतो ना, तेव्हा ह्याला लहान लहान चांदण्यांच्या आकाराची बावळट दिसणारी फ़ुलं येतात. मला माहित आहे, अनेकांच्या भुवया बावळट हा शब्द वाचून उंचावल्या जातील. मी बावळट हा शब्द अशासाठी वापरलाय की या फ़ुलांना ना धड गोड वास असतो ना सुंदर रंगरूप… कस यांच्याकडे भ्रमरांच लक्ष जाणार? दिड दोन सेमी आकाराची हिरवट पिवळी दिसणारी ही फ़ुलं गुच्छच्या गुच्छांमधे येतात. याची संदले आणि प्रत्येकी तीन पाकळ्या लांबट आणि सुट्या असतात. याचे पुंकेसर आणि स्त्रीकेसर असंख्य असतात. आणि गम्मत म्हणजे एकाच फ़ुलात अनेक बिजांडकोष असतात हे याच वैशिष्ट्य आहे. याच्या प्रत्येक फलिकेत एकच बी असते. तुम्ही निट बघितलं तर जाणवेल की साधारण पावसाळ्यानंतर या झाडावर वटवाघळं, खारी नी बरेच पक्षी येजा करतात. का? कारण सोप्प आहे . या झाडाची फ़ळं जुलै पर्यंत तयार होतात. पुढे महिनाभर जर ती झाडावरच राहिली तर ती पिकून काळी जांभळी बनतात आणि मग ह्या कव्हरला खायला हे पक्षी येतात. झाडाच्याखाली नीट पाहिलं तर ह्याच्या बिया पडलेल्या दिसतात. आणि तसं काही ह्या बियांची फार किचकिच नसते की इथे रुजणार नाही, तिथे रुजणार नाही म्हणून, त्या कुठेही पट्कन रुजतात. बहुतेक हेच कारण असेल याचा जास्त प्रसार होण्यामागे.आपल्या देशात फ़क्त वाळवंटात हे झाड रुजत नाही.

ashoka7

आपल्याकडे देशभर बहुतेक सर्व प्रांतात हे झाड रुजल्याने बहुतेक सर्व स्थानिक भाषांमध्ये या झाडाला नाबं उपलब्ध आहेत. परवा एका वाचिकेने याचा उल्लेख काष्ठ दारू असा केला होता. हे नाव मला परिचित नसून बंगाली व हिंदी भाषेत याला देबदारू हे नाव प्रचलित आहे. जाताजाता सांगायच म्हणजे हल्ली नियमित होणारी चूक जी मी सणावारांना होताना पहाते. पुर्वी आपल्याकडे बाराही महिने आम्रफ़ल म्हणजेच आंब्याच्या पानांना तोरणात झेंडू बरोबर ओवायचे किंवा बांधायचे. पण हल्ली जी तोरणं नामक दोरे विकायला येतात त्यात आंब्याच्या पानांना हद्दपार करून त्याजागी ह्या पानअशोकाचं पान आलय हे लोकांना कळत नाही की जाणवून ते त्याकडे दुर्लक्ष करतात? खरं खोटं लोकच जाणे. मी हा विचार करण हल्ली सोडून दिलय कारण त्याचा विशेष उपयोग होत नाही असं मला जाणवलय.माफक अपेक्षा आहे की आता हा लेख वाचल्यावर येणाऱ्या सणावारांना , लोकं अशोकाची पानं असलेली तोरणं घरादाराला बांधणार नाहीत.

ashoka3

रक्ताशोक किंवा “खरा अशोक”- [ Saraca asoca ]

मध्यंतरी माझ्या लेकीने ,आभाने लायब्ररीमधून ईग्लिश “रामायणा” हे पुस्तक वाचायला घरी आणलं होतं. त्या पुस्तकाच्या कव्हरवर सीता अशोकाच्या झाडाखाली बसून विलाप करतेय असं चित्र होतं. ते पुस्तक ईंग्रजी माध्यमाच्या लहान मुलांसाठी योग्य होतं पण त्यात काहीतरी खटकत होतं. मलाच कळेना काय खटकतय? तेवढ्यात आभा म्हणाली, “आयु, डू यु थिंक सो सीता ह्या झाडाखाली बसली असेल? हनुमानाने ह्या झाडावरून उडी कशी मारली असेल? ह्याला तर ब्रान्चेसच नाहीत”. तेव्हा जाणवलं की मला काय खटकतय? खटकत होतं ते सीतेच्या मागे असलेलं झाड क्रिसमसला हिरवे कागद उभे उभे कापून चिकटवतात तस उभ अशोकाच झाड होतं. त्याला फ़ांद्याच नव्हत्या.कस काय हे झाड सीतेवर सावली धरणार? कशी ती त्याखाली बसून विलाप करणार नी कसा तो वायुपुत्रं त्यावरून उडी मारणार? आभाला पडलेला प्रश्न किती जणांना पडतो? खरं सांगायचं तर अनेकदा हे कव्हर मी पाहिलं होतं पण मलाही हा प्रश्न पडला नव्हता. माझा आजचा लेख सीतेच्या खऱ्या अशोकावर लिहितेय जो खरा अशोक आहे.

ashok4

आपल्याकडे दोन प्रकारचे अशोक मिळतात. आपल्याला पुर्वीपासून माहित असलेला सीतेचा अशोक.ज्याला “रक्ताशोक किंवा “खरा अशोक” म्हणतात. १००% भारतिय झाड आहे हे. वनस्पतीशास्त्रात ह्याला “सरका असोका” [ Saraca asoca ] किंवा “सरका इंडिका”  असं म्हणतात. गम्मत म्हणजे हे झाड बहावा, चिंच यांच्याच कुळातल आहे. असोका हे नाव मुळच्या अशोक ह्या नावावरून आलय नी इंडिका म्हणजे इंडियन म्हणजेच भारतिय. आपल्या देशात बहुतेक सर्वत्र हे झाड उगवतं. आपल्याच देशाबरोबर श्रीलंका, मलेशिया ब्रम्हदेश या शेजारी देशांमधे पण हे झाड भरपूर पहायला मिळतं. याचं इंग्रजी नाव Sorrowless tree अगदी “ज्याला शोक नाही असां तो अशोक” ह्याच शब्दश: भाषांतराच जणू. अशोकाच्या सौन्दर्याची अनेक वर्णनं आपल्या संस्कृत लिखाणात आढळून येतात. रावणाच्या बागेत फ़ुललेला तो हाच अशोक ज्याच्या वाटिकेत, अर्थात अशोक वाटिकेत सीतेने शोक केला ! आता ह्याच्या खाली बसून असं म्हंटल की त्याची उंची काय? हा प्रश्न आहेच. साधारण दहा मिटर उंच होणारं हे झाड अगडबंब होत नाही. डेरेदार, पसरट नी झुकलेल्या फ़ांद्या जणूकाही शालिनतेने सावरून उभं राहणार हे झाड खुप सुंदर दिसतं.याची फ़ुलं तर सुंदर असतातच पण पानांना सुद्धा निसर्गाने अती सुंदर बनवलय. एकाआड एक अशी उगवणारी पानं मोठी चकचकीत हिरवीगार असतात.

ashok1ashok6

सिसालापेनिसी कुळातल्या [ Caesalpinioideae ] ह्या झाडाला याला पालवी फ़ुटते ना तेव्हापण हे झाड खुपच देखणं दिसतं.पानांचा बहर येताना फ़ुटलेली पालवी धुरकट करडी असते. मग ती नाजूक कोवळी पालवी किरमीजी लाल, मग राणी झाक असलेला गुलाबी लाल मग पोपटी आणि शेवटी हिरवीकंच होतात. ह्याचा फ़ुलण्याचा काळ साधारण फ़ेब्रुवारी मार्च ते मे मधे असतो. काही वेडे अशोक सरत्या पावसाळ्यात ऑक्टोबरमधेपण फ़ुलतात. ह्याची फ़ुलं म्हणजे निसर्गातली एक गम्मत आहे. यांना पाकळ्याच नसतात. डायरेक्ट फ़ुल उमलतं. साधरण दिड दोन सेमी आकाराची ही फ़ुलं उमलताना पिवळ्या रंगाची मग भगवी नारंगी आणि शेवटी लाल रंगाची होतात.कुंडीमधे लावलेल्या शोभेच्या एक्झोरा फ़ुलांच्या घोसासारखे याच्या फ़ुलाचे घोस दिसतात. यांना ७/८ पुंकेसर असतात.आणि वास पण भन्नाट वेगळाच असतो. अतिशय सुमधुर असा मध याच्या फुलांमध्ये असतो. एकदा का ही फ़ुलं फुलली की किड्यांची मधमाशांची अगदी लगबग सुरु होते याच्या अवतीभोवती मध खाण्यासाठी.

ashok7

फ़ुलांपाठोपाठ उन्हाळ्यात धरलेल्या शेंगा साधारण पावसाच्या सुमारास वाळतात.प्रचंड मोठ्या नाही पण साधारण १०/ २० सेमी लांब असणाऱ्या याच्या शेंगा साधारण ५/७ सेमी रुंद असतात. मग तुम्हीच सांगा, अशा लहानसर शेंगाना मोठ्ठ्या कोण म्हणणार? प्रत्येक शेंगेत ना साधारण ५ /८ काळसर राखाडी बिया असतात. ह्या बिया पट्कन रुजून चटकन फ़ुलणार गुणी झाड म्हणुन बिनदिक्कत सीतेच्या अशोकाकडे बोट दाखवता येतं. . गम्मत सांगते, प्रत्येक राज्याच एक झाड असतं. हे झाड कित्ती नशिबवान आहे , ह्याला उत्तर प्रदेशच राज्यिय झाडाचा मान मिळाला आहेच पण त्याच जोडीला, ओरिसा राज्याच्या राज्यिय फ़ुलाचापण मान मिळाला आहे. अशी फार थोडी झाडं आहेत ज्याला एकाहून जास्त राज्यांनी सन्मान दिलाय .

ashok8ashok2

प्रत्येक झाडाच्या औषधी उपयोगा प्रमाणेच सीतेच्या अशोकाच्या उपयोगाचा विचार केला तर ह्या झाडापासून भरपूर औषधं बनतात. गडद तपकीरी रंगाच खोड नी गुळगुळीत असलेली याची साल बहुगुणी समजली जाते. प्रसिद्ध अशोकारिष्ट नी अशोककल्प ही आयुर्वेदिक औषधं ह्याच्याच सालीपासून बनतात.या झाडाची अतीव सुंदर दिसणारी ही नाजूक फ़ुलं स्त्रियांच्या पोटाच्या दुखण्यासाठी वापरतात. यांचा अजून एक सर्वसामान्य वापर म्हणजे खास करून रक्ती आव होत असेल तर ही फ़ुलं उकळून अर्क बनवून दिला जातो. आणि हो, मुत्रमार्गाच्या विकारांसाठी याच्या बिया वापरतात. आता तुम्हीच सांगा , आहे ना गुणी झाड हे ? म्हणुनच मला हे झाड खूप आवडतं. दुर्दैवाने आपल्याकडे या झाडाची खरी ओळख झालीच नाही अस वाटतं. आपल्याकडे याची फ़ुलं देवपुजेसाठी एवढी वापरली जात नाही , पण दक्षिण भारतात नी पुर्वेच्या राज्यांमधे यांचा वापर पुजेसाठी केला जातो. जनककन्येमुळे आपल्याला हे पवित्र वाटतच पण राजपुत्र सिद्धार्थाचा जन्म याच झाडाखाली झाला असं मानतात त्यामुळे, बौध्द धर्मियांनापण हे झाड पुज्य आहे. आणि हो, जैन धर्मात भगवान महाविरानी याच्या सावलीत बसून हितोपदेश केले आहेत म्हणुन त्यांनापण ते पवित्र आहेच.

ashokacover

या झाडाला प्रचंड आकार नसल्याने अर्थात याचं लाकूड मोठ्या कामांसाठी वापरलं जात नाही. मुळातच धार्मिक महत्व प्राप्त झाल्याने या झाडाची तोड कमीच होते. पाश्चिम घाटात आणि अर्थातच सह्याद्रीच्या जंगलातही सहज आढळणाऱ्या ह्या झाडाच्या वाळक्या गळून पडलेल्या फ़ांद्यांना जळावू म्हणून गिरीजन वापरतात. बाकी शहरात या झाडाचा वापर सुशोभीकरणासाठीच जास्त होतो. अंगोपांगी फुललेला अशोक पहाणं या सारखं नेत्र सुख नसाव अशा मताची मी आहे . शुद्ध भारतीय झाडं एकाआड एक लावून अनेक भाग सुशोभित केलेले मी पाहिले आहेत. यात सीतेचा अशोक मुबलक आढळला आहे. आपल्याकडे मिळणारं हे सदाहरीत झाड लोकांना माहित का नाही हेच कळत नाही. आज गरज आहे ती डोळसपणे निसर्ग संवर्धन करायची. पावसाळ्यात डोंगरांवर, घाटात बिया उधळणारे अनेक निसर्गप्रेमी मला माहित आहेत . अगदी उत्तम काम ! पण एकच कळकळीची विनंती मी जाताजाता करू इच्छितेय. या पावसाळ्यात जमलं तर १००% भारतीय झाडांच्या बियाच निसर्गाला भेट द्या. आपल्या जंगलांना या झाडांची व झाडांना आपल्या मातीची जिवाभावाची ओळख असते. या निसर्गदत्त ओळखीमुळे अशा बियाना रुजायला फुलायला सहज शक्य असतं. अशाने आपल्या हातून निदान एखादंतरी १००% भारतीय झाड रुजायला मदत होईल. आता मी माझा हा फ़ाफ़ट पसारा आवरता घेतेय. पुढच्या लेखात मी दुसर्या अशोकाबद्दल लिहिन, तो पर्यंत सीतेचा अशोक शोधता येतोय का पहा ।

OLYMPUS DIGITAL CAMERA

मुचकुंद [ Pterospermum acerifolium ]

एका मित्राने खुप दिवसांपुर्वी ह्या झाडाबदल लिहायला सुचवले होते. अर्धवट लिहुन ठेवलेला तो लेख उन्हाळा स्पेशल लिखाणात मागे राहून गेला. खुप वाचकांनी ह्याबद्दल लिहावे असे सुचवल्याने आज मी पुन्हा एकदा १००% भारतिय झाडाकडे वळलेय.

OLYMPUS DIGITAL CAMERAM2

मुचकुंदाच झाड कसं दिसतं हेच मुळी अनेकांना माहित नसतं. अनेकजणं कुडाच्या झाडाला मुचकुंद समजण्याची चुक करत असतात.कनकचंपा , कनियर , काठचंपा अशा हिंदी नावांनी ओळखला जाणारा हा विशाल, सदाहरीत वृक्ष आपल्या सह्याद्रीच्या व पश्चिम घाटाच्या जंगलाचा अविभाज्य घटक आहे. टेरोस्पर्मम ऐसरीफ़ोलियम [ Pterospermum acerifolium ] असं दांडगं वनस्पतीशास्त्रिय नाव मिरवणारा मुचकुंद जंगली बदामाच्या कुळात , अर्थात स्टर्कुलिएसी कुळात [ Pterospermum] समाविष्ट आहे. साधारण २० मिटर उंच होणारा हा वृक्ष भरपुर डेरेदार दिसतो. ह्या डेरेदार झाडाची गम्मत अशी आहे की याच्या जाडजुड बुंध्याला अगदी थेट जमिनीजवळच अनेक नविन फ़ुटवे येतात आणि अनेकदा बघताबघता या झाडाचं चक्क बेट बनतं. मुचकुंदाचं झाड मजबुत असलं तरिही याची साल करडट काळसर रंगाची असते. जसंजसं हे झाड जुनं होत जातं तसंतसं ही साल रखरखीत भेगायुक्त होवुन जाते.

M1M3

मुचकुंद हे गमतिशीर नाव धारण केलेल्या झाडाला लांबुनही ओळख देणारी गोष्ट म्हणजे त्याची मोठ्ठी पानं. साधारण ३०/४० सेमी असणारी ही पानं खुपच ठळक या सदरात मोडतात. तळाला भुरकट पांढरट असणारी ही पसरट पानं वरच्या अंगाला चकचकीत हिरव्या रंगाची असतात. पानाच्या तळाला मऊमऊ धुरकट पांढरट लव असते. ही पानं अगदी अनियमित, वेगवेगळ्या आकारात पण टोकदार कोपरे असलेली असतात. या मजेशीर पानांचा साधारण २०/३० सेमी लांबीचा देठ पानाच्या मध्यभागी कधीच जोडलेला नसतो तर थोडासा वरच्या अंगला उचलून जोडल्यासारखा दिसतो. मॊर्फ़ॊलॊजी मध्ये [रचनाशास्त्र] या प्रकाराला ’पेल्टेट लीफ़ म्हणतात.

फ़ोटोतलं फ़ुल पाहून काल अनेकांनी मला याबदल बरेच प्रश्न विचारले. मुचकुंदाची फ़ुलं खुप सुंदर नी अगदी वैषिठ्यपुर्ण अशीच असतात. साधारण २० सेमी होणारी ही फ़ुलं अगदी वेलची केळी सोलुन ठेवल्यासारखी दिसतात. पाच नाजूक लांब व सुवासिक पाकळ्यांच हे फ़ुल अगदी सुकुन पिवळट पडलं तरीही त्याला सुवास येतच रहातो. या फ़ुलाचा बिजांड कोश केसाळच असतो. सरत्या पावसाळ्यात ही फ़ुलं भरभरून फ़ुलतात नी थेट वसंत ऋतूपर्यंत हा बहर सुरुच असतो.याच जोडीला मुचकुंदाला फ़ळं धरायला सुरुवात होते. साधारण १५ सेमी लांब होणारं हे पाचधारी लवयुक्त खडबडीत फ़ळ झाडावरच सुकतं. यातल्या बियांना पंख असतात ज्या वाऱ्याबरोबर बी ला तरंगत दूर दूर नेण्याचं काम करतात. वनस्पतीशास्त्र तसं पहायला गेलं तर किचकट वाटतं. आता हेच पहा ना , मुचकुंदाचं झाड म्हंटलं की आठवतं ह्याच्या टेरोस्पर्मम या प्रजातीनामाचा अर्थ आहे पंख असलेल्या बिया असलेला. अर्थात ज्याच्या बिया वाऱ्यावर दूर दूर जातात तो.

M9M4

डिनर प्लेट ट्री, मॆपल ट्विस्ट, बयुर अशा इन्ग्रजी नावांनी ओळखल्या जाणाऱ्या ह्या झाडाचे उपयोग बरेच आहेत. या झाडाचं लाकूड तसं टिकावू समजलं जात असल्याने फ़र्निचर बनवण्यासाठी वापरात येतं. याचा अजुन एक उपयोग म्हणजे, प्लायवूड बनवण्यासाठी देखील हे वापरले जाते. लाकडाची खेळणी बनवण्यासाठी, काड्यापेट्या बनवण्यासाठी हे झाड उत्तम समजले जाते. आदिवासी लोकांमध्ये, आव थांबण्यासाठी याच्या पानांचा उपयोग केला जात असल्याच्या नोंदी आहेत. मुचकुंदाची फ़ुलं किटकनाशक म्हणुन वापरली जातात. रक्त दोषावरदेखील ही फ़ुले काही ठिकाणी वापरली जातात. याच्या पानांचा वापर पत्रावळीसारखा केला जातो म्हणुन डिनर प्लेट ट्री हे नाव रुढ झालय. भारतीय टपाल खात्याने या देखण्या झाडावर व फुलावर टपाल तिकिट व प्रथम दिवस आवरण प्रकाशित करून आपल्या झाडाला जगभर नेलंय .

M7M8

कर्नाटाकातल्या शिरसीच्या जंगलात मी या वृक्षाला फ़ुललेलं पाहिलय . अतिशय देखणं दिसणारं हे झाड साधारण उष्ण हवामानात, लख्ख सुर्यप्रकाश व भरपुर पाणी असलेल्या ठिकाणी मस्त वाढतं. शासनाच्या सामाजिक वनिकरणाच्य रोप वाटिकांमध्ये बियांपासून तयार केलेली याची रोपं उपलब्ध होऊ शकतात. भरभर उंच होणाऱ्या या झाडाला साधारण २/३ वर्षात फ़ुलं यायला सुरुवात होते.आज १००% भारतिय झाडं परिसरात लावणं गरजेचं आहे. परिसर सुशोभित, सुगंधी करु इच्छिणाऱ्या वृक्ष वेड्यांनी मुचकुंदाचा पर्याय या पावसाळ्यात निवडायला हरकत नाही.

तामण /जारुल [ Lagerstroemia reginae ]

आज १ मे … महाराष्ट्र दिन . माझा महाराष्ट्र ज्यातलं जैव वैविध्य जगभर प्रसिद्ध आहे. आजचं लिखाण अर्थात माझ्या महाराष्ट्राच्या मानचिन्हाबद्दल. प्रत्येक राज्याचे प्राणी, झाड, फ़ुल असे चिन्ह असते. महाराष्ट्राचं राज्यिय फ़ुल आहे जारूल/ तामण जे सध्या अनेक ठिकाणी फ़ुललेलं दिसतय.

jarul9jarul1

प्राईड ऑफ ईंडिया, क्विन ऑफ फ्लॉवर , जायंट क्रेप मर्टल अशी विविध ईंग्रजी नावं मिरवणारं हे सुंदर फ़ुल आपल्या राज्याचं फ़ुलं म्हणुन ओळखलं जातं. पळसाचा सरता पुष्पोत्सव भर उन्हाळ्यात तामणाला जणू खो देतो नी हे मध्यम आकाराच हिरवं डेरेदार झाड जांभळट गुलाबी फ़ुलांनी बहरुन जातं. १००% भारतिय असलेलं हे सुंदर झाडं महाराष्ट्राच्या बहुतेक सर्व भागात आढळतं. हिंदी भाषेत जारुल म्हणुन ओळखलं जाणारं हे झाडं आपल्या विदर्भाकडेही जारूल म्हणुनच ओळखलं जातं. कोकणात याला मोठा बोंडारा म्हणतात कारण याला जी फ़ळं येतात ती मोठ्या बोंडासारखी दिसतात. ” ल्यॆगरस्ट्रोमिआ रेगिनी ” [ Lagerstroemia reginae ] असं वनस्पतीशास्त्रिय नाव धारण केलेलं, मेंदीच्या कुटुंबातलं [लिथ्रेसी – Family Lythraceae] हे झाड एका स्विडिश निसर्ग अभ्यासकाच्या नावाचं [ Magnus von Lagerstroem ] स्मरण आहे. प्रसिद्ध वनस्पती शास्त्रज्ञ लिनियस [ Carl Linnaeus ] याला या झाडाचे नमुने लॆगरस्ट्रोमने नेउन दिले म्हणुन आपल्या मित्राच्या सन्मानार्थ त्याने या झाडाचे नाव ठेवले. साधारण ५० ते ६० फ़ुट ऊंच वाढणारं हे देखणं झाड लांबुळक्या पानांनी समृद्ध असतं. साधारण १० ते १५ सेमी लांबीची वरुन हिरवीगार नी खालच्या बाजूने फ़िक्कट हिरवी पानं आणि गुलाबी जांभळी फ़ुलं हे या झाडाच वैशिष्ठ म्हणता येउ शकतं.या झाडाची साल साधारण पिवळट भुरकट रंगाची आणि गुळगुळीत असते. या सालीचे नियमित पापुद्रे गळून पडतात अगदी पेरुच्या झाडासारखे. हिवाळ्यात बहुतांश झाडांप्रमाणे ह्याही झाडाची पानं तांबडट होवुन गळून पडतात.

jarul3jarul2

वसंतात नाजूक कोवळी पानफ़ुट सुरु होतानाच फ़ुलांनाही बहर यायला सुरुवात होते. निष्पर्ण फ़ांद्यांच्या टोकाला साधारण २५/३० सेमी लांब फ़ुलाचे घोस यायला सुरुवात होते. या जांभळट गुलाबी फ़ुलांच वैशिष्ठ्य म्हणजे ही खालून वर उमलत जातात. पुर्ण उमललेली ५/६ सेमी ही फ़ुलं जणू गुलाबी झालरींचा गुच्छच वाटतो. साधारण ६/७ झालरींच्या गुलाबी जांभळ्या पाकळ्या व त्यात उजळ पिवळ्या रंगाचे नाजूक पुंकेसर हे तामणीचं वैशिष्ठ्य म्हणता येऊ शकतं. या फुलांच अजून वैशिष्ठ्य सांगायचं म्हणजे प्रत्येक फुल फुलायला साधारण २ ते ३ तास लागतात. संशोधन सांगतं की ही फ़ुलं जास्तीतजास्त २/३ दिवसच फुललेली रहातात . यांतील मध खाण्यासाठी मध माशांच्या जोडीने भुंगे देखील गर्दी करतात. उन्हाळ्याच्या शेवटी या झाडाची फ़ळं अर्थात बोंड धरायला सुरुवात होते. साधरण ३ सेमी आकाराची होणारी ही फ़ळं टोकाकडे टोकदार नी वर कडक आवरण असलेली ठळकपणे दिसून येतात. ही फ़ळं सुकल्यावर साधारण काळसर तपकिरी होतात. या सुकलेल्या बिया अगदी पातळ चपट्या असतात. या बियांना म्हातारीच्या बियांसारखे कापूस पंख असतात जे त्यांना बीज प्रसारासाठी दूरदूर वाऱ्यावर वाहून घेउन जातात.

jarul4jarul8

तामण झाडाचं लाकूड उत्तम या सदरात मोडतं. मजबूत म्हणुन ओळखलं जाणारं हे लाकूड लालूस चमकदार छटेचं असतं. अनेक मोठ्या बांधकामांसाठी यांचा वापर केला जातो. या झाडाचे अनेकाविध उपयोग आहेत . याच्या सालींचा उपयोग आयुर्वेदात ताप उतरवण्यासाठी केला जातोच पण याची पाने देखील उपयोगी समजली जातात. यात असलेल्या कोरोसॊलिक आम्लामुळे या पानांचा वापर पुर्वेकडच्या अशियन देशांमध्ये चहामध्ये केला जातो. फ़िलिपाईन्स या देशात तर चक्क याचा उल्लेख सरकारी झाडं असं केला जातो.आपल्याकडे या झाडाचा उपयोग हल्ली मुख्यत्वे सुशोभिकरणाचा वृक्ष म्हणुनच केला जातो. हे झाड अगदी सहज कुठेही रुजते नी फ़ुलते. महाराष्ट्रातच नाही तर संपुर्ण भारतात हे झाडं फ़ुलतं. मात्र विविध भागातल्या हवा, पाणी व जमिनीच्या फ़रकांमुळे याच्या फ़ुलांच्या रंगछटांमध्ये वैविध्य जाणवतं. भारतीय टपाल खात्याने या झाडाच्या सन्मानार्थ टपाल तिकीट काढलेलं आहे.

jarul7

आज महाराष्ट्र दिन… “कणखर देशा, राकट देशा, दगडांच्या देशा ” अशी बिरुदावली अभिमानाने मिरवणाऱ्या राज्याचं राज्यिय फ़ुलं इतकं सुंदर नी झाड इतकं देखणं असु शकतं यावर जणू विश्वासच बसत नाही. मी डेहेरादूनला शिकत असताना, जेव्हा केव्हा तामण समोर यायचं, तेव्हा मनाला न चुकता सह्याद्रीमधुन फ़िरवुन आणायचं. सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या थेट निसर्गातून खुप शुभेच्छा. या पावसाळ्यात एकतरी तामण लावुन ती वाढवुया. जय महाराष्ट्र.

गुलमोहोर- [ Delonix regia ]

गुलमोहोर यच्चयावत कविंचा नी लेखकांचा लाडका असतो. गुलमोहोरावर न लिहिलेला कवि किंवा लेखक विरळाच.[ थोडक्यात काय? तर या गुलमोहोरावर लिहून मी सुद्धा आज त्याच पंक्तीत जाऊन बसलेय ] या झाडाभोवती अनेकांची भावविश्व गुंफ़लेली असतात. अगदी पुर्वी चित्रपटांमधेपण निष्पर्ण गुलमोहोर दाखवून ’उजडी हुई जिंदगी’ दाखवली जायची. भारतीय जनमानसात अढळ स्थान मिळवलेला हा वृक्ष मुळात भारतिय नाहीच. आश्चर्य वाटलं ना हे ऐकुन? अगदी खरय.

gu2gu1

मुळचा मादागास्कर बेटावरचा हा वृक्ष बिटिश आणि पोर्तुगीज लोकांनी सगळ्यात पहिले मोरिशियस मधे लावला. त्यानंतर स्वत:बरोबर जगभर विविध उष्ण कटिबंधिय देशांमधे नेउन रुजवला.भारतात, ब्रिटिशांनी साधारण १८व्या शतकात मुंबईत हे झाड लावलं असावं. १८४० साली मुंबईच्या शिवडी भागात गुलमोहोर फ़ुलल्याची पहिली नोंद आहे. ईग्रजीत ह्या झाडाला फ़्लेम ट्री किंवा फ़्ल्यामबॊयंट ट्री [ Flamboyant ] म्हणतात. याच जोडीला ईग्रजीमधे याला गोल्ड मोहोर नी रॊयल पॊइनसियाना [ Royal Poinciana ] अशीही नावे प्रचलीत आहेत. बहुतेक सर्व भारतिय भाषांमधे गुलमोहोराला नावे आहेत याचाच अर्थ, आपल्या देशात हे झाड सर्वत्र रुजलेलं आहे.बहावा, चिंच, कांचन यांच्या “सिसालपिनीएसी कुळात” [ Family: Fabaceae Subfamily: Caesalpinioideae ] या झाडाचा समावेष होतो. याच शास्त्रिय नाव आहे “डेलोनिक्स रेजिया” [ Delonix regia ]. डेलोनिक्स म्हणजे ह्याच्या फ़ुलाच्या आत असलेल्या ठळकपणे दिसणार्या हूक्स सारख्या टोकदार वळलेया नख्या आणि रेजिया म्हणजे राजेशाही.

gu3

गुलमोहोराबद्दल काय सांगायच? त्याचं पानं गाळणं, निष्पर्ण होणं नी फ़ुलं फ़ुलणं अगदी बघण्यासारखं असत. हे झाड साधारंण २० मिटर उंच वाढतं. साधारंण ७० ते ८० सेमी चा व्यास असलेलं याच राखाडी तपकिरी रंगाच खोड बर्यापैकी गुळगुळीत असतं. तीच गोष्ट याच्या फ़ांद्यांचीपण असते. त्यापण बर्यापैकी गुळगुळीत असतात नी त्याच रंगाच्या असतात. याची पानं खूप मोठी तर असतातच पण त्याच्या पर्णिका बर्यापैकी झिरझीरीत झिपरी असतात. या झिपऱ्या पानांकडे पाहिलं की लहानपणी केलेले चाळे आठवतात. लहानपणी पानाच्या देठाकडे पकडून दोन बोटांच्या चिमटीत सर्र्र्र्र्कन पानं ओढून गोळा करून हुर्र्र्र्र्र्र्र्र करून वर भिरकावलेली व्यक्ती न मिळणं विरळाच. याचा जोडीला, येताजाता पावसाळ्यात याच्या फ़ांदया ओढून, मागुनं येणार्या व्यक्तीच्या अंगावर पावसाचा शिडकावा पाडलेला असतोच असतो. लहानपणीचा अजून एक आवडता खेळ म्हणजे याच्या फ़ुलातल्या नख्या एकमेकांमधे अडकवून राजाराणीचं बैठं युद्ध खेळायच. मला तर आठवतय, भातुकली खेळताना याच्या टप्पोऱ्या कळ्या आम्ही चिरून भाजी भाजी खेळायचो. याच जोडीला फुलातली पांढरी पाकळे, अर्थात कोंबडा पण खायला वापरायचो. गेले ते रम्य बालपणीचे दिवस नी गेला तो अंगणातला गुलमोहोर ! असो. थंडीला सुरुवात झाली की याची सगळी पानं गळून पडतात. मग हळूहळू, सरत्या वसंत ऋतूत याला नाजूक पालवी फ़ुटायला लागते. आणि जणू सगळ झाडं हिरवट पोपटी शालू नेसून फ़ुलायला तयार होतं.

gu4gu5

आपल्याकडे साधारण मार्च मधे थंडी संपलेली असते. गुलमोहोराचा फ़ुलण्याचा काळ म्हणजे एप्रिल ते सरता जून.याची फ़ुलं खुप लाल भडक नी चित्ताकर्षक असतात. या फ़ुलांचे गुच्छ फ़ांद्यांच्या टोकांना येतात. फ़ुगीर नी गब्बू कळ्या खालून वर उमलत जातात. हे फ़ुल साधरण १० सेमी असतं.सुट्या पाकळ्या साधारंण पाच असतात. त्यात सुट्टे पुंकेसर असतात. आणि सगळ्या पाकळ्या साधारण लहानमोठ्या असतात. यातल्या चार पाकळ्या लाल, केशरी किंवा भगव्याची रंगाची छ्टा असलेल्या असतात.मात्र एकच पाकळी अगदी वेगळी असते. ती एकतर पिवळट असते किंवा पांढरट असते. या वेगळ्या पाकळीवर लाल रंगाच्या रेषा असतात.[ या पाकळीला बहुतेक ठिकाणी कोंबडी म्हंटल जातं ]. काही ठिकाणी चक्क पिवळा गुलमोहोरही पहायला मिळतो. या फ़ुलांना खास वास असा नसतोच पण अगदी दीर्घ श्वास घेऊन हे फुल हुंगल तर एक कडसर वास सहज जाणवतो.

gu6gu7

आपल्याकडे पावसाळा हा पुर्ननिर्मितीचा उत्सव असतो. निसर्गातली बहुतेक सर्व झाडं या ऋतूत पुढच्या पिढ्यांची तयारी करत असतात. या झाडाला पावसाळ्यात चप्पट हिरव्या लांबलांब शेंगा लागतात. साधारण हातभर झाल्यावर या शेंगा हिवाळ्यात सुकतात नी खुळखुळ वाजतात. या खुळखुळ वाजणार्या काळपट शेंगेत काळसर चपट्या अश्या ३० /४० बिया असतात. या बियांमधून गुलमोहोराची रोपं बनतात. आधुनिक पद्धतीनेपण रोपं तयार करतात नी लौकरात लौकर म्हणजे ३ /४ वर्षात हे झाड फ़ुलायला सुरुवात होते. जिथे जिथे हा वृक्ष गेलाय, तिथे तिथे ह्याचा उपयोग फ़क्त उद्यानाच्या शोभेसाठीच केला गेलाय. बाकी देवपुजेसाठी किंवा घरात शोभेसाठी याच्या फ़ुलांचा वापर कोणीच करत नाही. तीच गोष्ट याच्या लाकडाचीपण आहे. लाकडाच्या कुठल्याही व्यवसायासाठी हे लाकूड कुचकामी असते कारण ते टिकावु नसते. सुरुवातीलाच लिहिल्याप्रमाणे हे झाड परदेशी असल्याने आपल्या पक्षांना हे झाड कायम परकेच वाटत आलय नी त्यावर कोणीही घरटे करत नाही. अगदी क्वचित कावळे त्यांच अस्त्याव्यस्त घरटं या झाडावर बनवतात .

gu8

आपल्याकडे सोसाट्याचा वादळ वारा आल्यावर अनेक ठिकाणी जी झाडं पडतात त्यात गुलमोहोरची संख्या जास्त असते . याच कारण या झाडाची आधारमुळे [बट्रेस्ट रूट्स] जमिनीच्या वरवरच्या थरात रहतात त्यामुळे आसपासच्या फ़रशा पटपट उचकटल्या जातात. ह्या झाडाची मुळं खुप खोलपण जात नाहीत. सहाजिकच सोसाट्याच्या वाऱ्यासमोर हे झाड जमिनीत घट्ट मुळं रोवून उभं राहू शकत नाही. सगळ्यात मोठ म्हणजे, या झाडाच कचरा फ़ार होतो नी तो खतासाठी फ़ारसा उपयोगी नसतो. जाता जाता सांगायची ठळक गोष्ट म्हणजे ज्या मादागास्कर बेटावरून मधून हे झाड आलय ना, तिथेच आता हे झाड चक्क नामशेष झालय…. है ना मजे की बात?

या परदेशी झाडांना पाहिलं की मनात काही विचार कायम येतात. १८ व्या शतकाच्या म्हणजे याच्या आगमनाआधी आपल्याकडे शुद्ध भारतिय वृक्ष नव्हते का? होते ना?आपली वनं, अरण्य़ं नी जंगलं ओस पडली होती का? नाही ना? मग आताच ह्या गुलमोहोरांच एवढ प्रस्थ का? तो पट्कन वाढतो म्हणुन? हल्ली झट्पट इन्स्टंट च्या जमान्यात आपल्याला झाडंपण इन्स्टंट हवी आहेत का? उत्तर नाही असं असेल तर मग चला ! एकतरी शुद्ध भारतिय झाड लावूयात . आणि जेव्हा १००% भारतीय झाड लावाल, तेव्हा मला कळवा . म्हणजे त्या झाडाच्या पहिल्या वाढदिवसाला शुभेच्छा द्यायला न विसरता मी तो दिवस लक्षात ठेवेन…..

फणस – Artocarpus heterophyllus

कापा, बरका… लहान मोठा, गोड, करकरीत कसाही असला तरी मला फ़णस प्रचंड आवडतो. आपल्या जंगलात सररास आढळणारं फ़णसाच झाड १००% भारतीय आहे ! भारत आणि शेजारच्या देशांमधे हे झाड मुबलक प्रमाणात आढळतं. तसं पहायला गेलं तर गेली ६,००० वर्ष लोकं हे झाड लावताहेत नी त्याची फ़ळं खाताहेत. वनस्पती शास्त्रात Artocarpus heterophyllus ओळखलं जाणारं फणस अर्थात Jackfruit हे झाड मलबेरी कुटुंबाचा सदस्य आहे [ Family: Moraceae ]. जसं फ़णसाच झाड एशियात खंडात मिळतं तसच अफ़्रीकेतपण मिळतं. या झाडाचं वैषिठ्य म्हणजे झाडांवर येणाऱ्या फ़ळांमधलं सगळ्यात मोठ फ़ळ म्हणजे फ़णस. ह्या झाडाची उंची चांगली २०/२५ मिटर उंच होते. या झाडाच्या जवळ जाऊन पाहिलं तर दिसून येतं की याची पानं कशी मस्त असतात. वरच्या बाजूला गडद हिरव्या नी खालच्या बाजूला तशीच फिक्कट पांढरट हिरव्या रंगाची ही पान जाड आणि चकचकीत असतात. फणसाच्या झाडाला भरपूर पानं येतात नी झाडाला पुर्ण वर्षभर हिरवं ठेवतात.अर्थातच हे झाड सदाहरित या सदरात मोडतं. कोकणात , गोव्यात या पानांचे द्रोण बनवून त्यात तांदळाची उकड किंवा हर्बल इडल्या बनवल्या जातात ज्या अतिशय चविष्ट लागतात.

fanas6fanas7

या झाडाला साधारण फ़ेब्रुवारीत फ़ुलं येतात. ही फ़ुलं पानांच्या आड असतात. नंतर त्यातुन लहान ट्युब्ज्स सारखी बाळ फ़णस फ़ळं बनायला सुरुवात होते. ही फ़ळं ना सुरुवातीला लहान असतात नी नंतर एकदम फ़टाफ़ट मोठी होतात. उन्हाळ्यात मोठे झालेले फ़णस खाण्यासाठी तयार होतात. जसं आंब्याचं असतं तसच फ़णसाचपण असतं. एका वेळेला चांगली डझन डझन फ़ळं येतात झाडावर.आणि गम्मत म्हणजे अगदी झाडाच्या खोडापासूनच ही फ़ळं येतात. या फ़णसाचे दोन प्रकार असतात. एक असतो कापा फ़णस जो घट्ट असतो नी दुसरा असतो बरका फ़णस जो थोडासा गिळगिळीत. फ़णसाचं फ़ळ कुठुनही ओळखता येतं हे मला माहित आहे. कारण अगदी सोप्पी आहेत. एक तर अगदी लांबूनपण ह्याचा वास येतो नी दुसरं म्हणजे ह्या फ़ळाच्या अंगावर असलेले काटे आणि चीक जो अनेकांना अजिबात आवडत नाही. हो ना? फ़णसाला त्याचा स्वत:चा भरपूर वास असतो.हा वास काही लोकांना आवडत नाही.याच्या अंगावरचे काटेपण बऱ्याच जणांना आवडत नाही कारण ते सोलताना खुप त्रास देतात. तीच गोष्ट चीकाची. ह्या दोन्ही गोष्टींमुळे फ़णसाचा गर आणि बी अगदी सेफ़ रहाते. फ़णस सोलण ज्याला फ़णस फ़ोडणं म्हणतात हे खरच कटकट असते. हा चीक एकदाका अंगाला चिकटला की निघता निघत नाही.

fanas8

फ़णसाचं वजन साधारण ४० किलो पर्यंत होऊ शकतं. आणि एका फ़णसात साधारण ५०/७५ बिया सहज असतात. उन्हाळ्यात येणाऱ्या अनेक मस्त फळांची बी काही खाता येत नाही .पण फणसाची बीपण आनंदाने खाल्ली जाते .या बी ला आठोळी म्हणतात नी ती उकडून नुस्त्या तिखट मिठाबरोबर भन्नाट लागते. फणस एक असं फळ आहे की ज्याचे नानाविध उपयोग आहेत . भाजी होते, तळळेले फ़रसाण होते, फ़णसपोळी होते, सरबत, ज्याम, जेली पण होते. कोकणात फ़णसाचे इतके पदार्थ करतात ना की बास रे बास. आपल्याकडे जसं कोकणात फ़णस प्रिय, तस्सच बंगाली लोकांनापण फ़णस फ़ार प्रिय असतो. कलकत्त्यात मी फ़णसाची मिठाई खाल्ली आहे. गमतीची गोष्ट म्हणजे आपला शेजारी बांग्लादेशच फ़णस हे राष्ट्रीय फ़ळ आहे. त्याला ते बंगाली भाषेत ‘काथाल’ म्हणतात फ़णसाचे फ़ळ म्हणुन उपयोग बरेच जणं सांगतात. पण ह्या झाडाचा उपयोग खुप आजारांवर केला जातो. फ़णसाच्या पानांचा अर्क ताप आल्यावर वापरावा असं आयुर्वेद लिहिलय. हाच अर्क त्वचेच्या आजारांवर , डायबेटीस साठी, गळू आलं की वापरतात. जे फ़णस आपण खातो ना ते नियमीत टॊनिक म्हणुनपण खावा कारण त्याच्या हार्टसाठी चांगल असलेलं फ़्लावोनाईड्स असतं. ह्याखेरीज ह्यात बी१, बी२, बी ६ आणि व्हिट्यामीन ए, सी असतं. पिकलेला फ़णस खुप खाल्ला तर जुलाब होतात कारण याच्यात लक्सेटीव्ह गुणधर्म आहेत. ह्या झाडाच्या सालीचा अर्क अजुनही आदिवासी लोकं झोप येण्यासाठी वापरतात. नुसतं वरवरच झाडच नाही तर फ़णसाची मुळं पण खुप उपयोगी असतात. ह्या मुळांचे तुकडे करून पाण्यात उकळवून ते पाणी अस्थमा असलेल्यांना देतात. ह्यामुळे त्वचेचे बरेच रोग दूर होतात असं आयुर्वेद सांगतो.ज्यांना ब्लडप्रेशरचा त्रास असतो त्यांनी हे फ़ळ जरूर खावे असं वैद्य सांगतात. मग सागा बरं, आहे ना फ़णस खुप उपयोगी?

fanas5faNas2

जाताजाता सांगायची गोष्ट म्हणजे या झाडाचं लाकूड खुप चांगलं समजलं जातं. ईस्टर्न म्हणजेच पुर्वेच्या देशांमधे या लाकडापासून संगीत वाद्य बनवतात. दूर कशाला, अग आपल्याकडे ज्या विणा वाजवतात ना? त्यापण ह्याच्यापासूनच बनवतात. याच्या लाकडाच्या लहान लहान होड्या बनवतात.आपल्याकडे केरळ मधे पुजेच्या वेळेला बसायला गुरुजींसाठी ह्याच लाकडाचं आसन बनवलं जातं. परदेशात बुद्धीस्ट मॊनेस्ट्रीजमधेपण ह्याच झाडाच लाकूड वापरलं जातं.याच्यातून निघणारा मातकट मरून रंग बौद्ध भिक्षूंच्या कपड्यांना डाय करायला वापरतात. फ़णसाच लाकूड चांगलं असल्याने त्याचा उपयोग फ़र्निचर बनवायला होतो. कोकणात नी गोव्यात हे झाड मुबलक प्रमाणात उगवतं पण फ़णसाची झाड खुप लावून आपण शेती करत नाही. परदेशात चक्क यांची शेती होते. आणि या शेतीतून पिकणाऱ्या फ़णसाच्या न्युडल्स, पापड, आईसक्रीम्स, फ़णसाच पीठ अशा गोष्टी बनवायला तिकडे सरकार मदत करतं.

fanas10fanas3

मला माहित आहे की लेख फणसासारखाच मोठ्ठा झालाय आता मी लिहायच थांबवणार आहे. आपल्याकडे सध्या फ़णसाचा धमाका सुरु झाला आहेच. महाराष्ट्रातल्या फ़णसांच्या जोडीला केरळ,कर्नाटक, आंध्र मधून फ़णस येतात. ह्यांची चव थोडीशी वेगळी लागते. बाकी भारतभर फ़णस खाउन माझ्यासारखेच खुष होणारे लोक आहेतच. चला आज फ़णस खाउयात आणि खुष होऊयात……

Jacfruit at Nunem

वटवाघूळ [ Bat ]

वाईल्ड लाईफ़ वाचवा वाईल्ड लाईफ़ वाचवा अशी नुसती नारेबाजी करून नी वाघ सिंहांबद्दलच फ़क्त बोलुन आपण आपल्या निसर्गाची माहिती करुन घेत नसतो. ज्या प्रमाणे घरातील्या सगळ्या सदस्यांची माहिती सगळ्यांना असणं गरजेच असतं तसच आपणसुद्धा निसर्गाच्या मोठ्या घरात रहातोय नी त्यातल्या जास्तीतजास्त सदस्यांची माहिती आपण करुन घेणं गरजेच आहे.

vaaghool1

वटवाघूळ म्हणजे ड्र्याकुला, रक्त पिणं [ लहान मुलांच्या भाषेत खून चुसणं], फ़क्त रात्रीच ऊड्णं असे भरपुर गैरसमज चिमुकल्या मेंदुत भरलेले असतात. लहान मुलंच काय? आपण मोठी माणसंपण वेगळी नाही आहोत. वटवाघूळ [ Bat ] पक्षी नसून चक्क प्राणीच आहे.आणि ते सुध्धा नुसते प्राणी नसून अगदी “म्यामल्स म्हणजे सस्तन प्राणी आहेत. आता सस्तन म्हणजे कोण ? जे पिल्लांना दुध पाजतात ते सस्तन.वटवाघूळाला पंख असतात पण तो पक्षी नाही. आहे न मजेशीर? ह्या प्राण्याच काईरोप्टेरा [ Chiroptera ] हे शास्त्रीय नाव ग्रीक भाषेतून आलय. ह्याचा अर्थ असा की ’काईरोज म्हणजे हात नी प्टेरॊन म्हणजे पंख’. म्हणजेच ज्याच्या हातांचे पंख झालेत तो! मस्त नं? मला तर हे नाव नी त्याचा अर्थ खुप आवडला. वटवाघूळांचा आकार अंग मिटुन बसल्यावर साधारण २०-२२ सेमी एवढाच होतो. पण तोच आकार त्यांनी पंख पसरल्यावर साधारण १२०-१२५ सेमी होतो. ह्या वाघूळांची कातडी अगदी तुकतुकीत काळी असते. बहुतेक वाघळं काळ्या नी राखाडी रंगाची असतात. ह्या वटवाघूळांना लहानसे पण अगदी धारदार दात असतात.

आपण बऱ्याचदा ह्या वटवाघूळांना दिवसा झाडावर उलटं लटकलेलं पहातो. हे रात्री सगळीकडे उडतात. म्हणजेच ते नॉक्टर्नल अर्थात निशाचर प्राणी आहेत. ह्यां वटवाघूळांना दिसत नाही असपण म्हंटल जातं पण हे खर नाही . यांची द्रुष्टी जरा कमजोर असली तरी ते अगदी आंधळे नसतात. आणी ज्या लहरी म्हणजे फ़्रीक्वेन्सीज आपण ऐकु शकत नाहीत अशा सुपरसॊनीक लहरी ही वाघळं निर्माण करतात नी सहज उडतात. ह्या त्यांच्या कसबाला “ईकोलोकेशन सिस्टीम” म्हणतात. म्हणजे लहरी सोडायच्या नी त्याचा मागोवा,जर त्या लहरी अडल्या नाहीत तर पुढे रस्ता मोकळा आहे असा अर्थ घ्यायचा असच काहीसं.

vaaghool2

लहान मुलांनाच काय बर्याच मोठ्या माणसांना माहित नसतं की भारतात जवळजवळ १२ जातीची वाघळं मिळतात. ह्यातलं फ़्रूट ब्य़ाट [ Fruit Bat ] म्हणजे फ़ळंखाऊ वाघुळ [ लिफ़ नोज्ड ब्य़ाट ] म्हणजे नकटे वाघूळ [ Greater short-nosed fruit bat – Cynopterus sphinx ] आपल्याकडे अगदी सगळीकडे आहे. आणी गम्मत म्हणजे ही फ़ुट ईटर वाघळं जगात सर्वात जास्त सापडणारी जात आहे. यांना इंडियन फ़्ल्याईग फॉक्स [ Indian flying fox – Pteropus giganteus ] असही म्हणतात . बहुतेक वाघळं किडे , फ़ळं, मासे खाउन साधारण १५/२० वर्ष जगतात.. ह्यांचा तस पहायला गेलं तर उपयोग खुपच आहे. जिथे यांच्या वसाहती म्हणजेच कॊलोनीज असतात तिथली जमिनीवरची माती खुप सुपिक असते. का? सोचो सोचो??? कारण ती माती म्हणजे त्यांनी केलेली विष्ठा असते नी ती शेतीला खुपच उपयोगी असते.साधारण पाण्याच्या जवळ, जंगलांमध्ये यांच वास्तव्य असतं. या वटवाघुळंचे ग्रुप्स असतात . साधारण १०/१५ नर एकत्र रहातात नी तीच गोष्ट माद्यांची देखील आहे. साधारण विणीच्या हंगामात नर मादी एकत्र येतात. आपल्याकडच्या पावसाळ्यात , म्हणजेच जुलै ते ऑक्टोबर या काळात यांचा विणीचा हंगाम असतो. साधारण १४० ते १५० दिवसांनंतर साधारण फेब्रुवारी ते मी च्या दरम्यान मादी वाघुळ १/२ पिल्लांना जन्म देते. ही पिल्लं आईच्या देखरेखीत वाढवली जातात . नर वटवाघूळ त्यांच्याकडे संगोपनात लक्ष देत नाही. सुरुवातीचे काही आठवडे आई त्याना बरोबर घेऊनच फ़िरते. नंतर साधारण ५ महिने आई यांची काळजी घेते . ही बाळ वाघूळं साधारण ११ आठवड्यांनी उडायला लागतात . साधारण दिड वर्षाची झाल्यावर ही पिल्लं वयात येतात .

vaaghool4vaaghool5

जाता जाता महत्वाची माहिती…. आपल्या देशात वटवाघूळ वाचवण्यासाठी हल्ली हल्ली लोक बोलायला लागलेत. ज्यांना नीट दिसत नाही असे जीव काय आपले डोळे फ़ोडणार? जे आपल्या देशातच नाहीत ते काय येणार तुमचं रक्त प्यायला? जगभर जवळजवळ १००० जातीची वटवाघळं सापडतात नी त्यातली फ़क्त २/३ च वाघळं रक्त पिउ शकतात….. जसं कुत्रा चावल्यावर, माकड चावल्यावर रेबिज होतो, तसच वाघूळ चावल्यावरपण रेबिज होवु शकतो. उगाचच भुत पिशाच ड्र्याकुला अशांचा काहीतरी संबंध ह्या शांत प्राण्याशी जोडुन आपण आपलच नुकसान करुन घेत असतो. आता तुम्हाला ही शास्त्रीय माहिती कळलीय, मग कोणीही वाघळांबद्द्ल काहीतरी थापा मारुन तुम्हाला ’लपेटत असेल’ तर ते एकुन घ्यायचं नाही.

vaaghool3