गुलमोहोर- [ Delonix regia ]

गुलमोहोर यच्चयावत कविंचा नी लेखकांचा लाडका असतो. गुलमोहोरावर न लिहिलेला कवि किंवा लेखक विरळाच.[ थोडक्यात काय? तर या गुलमोहोरावर लिहून मी सुद्धा आज त्याच पंक्तीत जाऊन बसलेय ] या झाडाभोवती अनेकांची भावविश्व गुंफ़लेली असतात. अगदी पुर्वी चित्रपटांमधेपण निष्पर्ण गुलमोहोर दाखवून ’उजडी हुई जिंदगी’ दाखवली जायची. भारतीय जनमानसात अढळ स्थान मिळवलेला हा वृक्ष मुळात भारतिय नाहीच. आश्चर्य वाटलं ना हे ऐकुन? अगदी खरय.

gu2gu1

मुळचा मादागास्कर बेटावरचा हा वृक्ष बिटिश आणि पोर्तुगीज लोकांनी सगळ्यात पहिले मोरिशियस मधे लावला. त्यानंतर स्वत:बरोबर जगभर विविध उष्ण कटिबंधिय देशांमधे नेउन रुजवला.भारतात, ब्रिटिशांनी साधारण १८व्या शतकात मुंबईत हे झाड लावलं असावं. १८४० साली मुंबईच्या शिवडी भागात गुलमोहोर फ़ुलल्याची पहिली नोंद आहे. ईग्रजीत ह्या झाडाला फ़्लेम ट्री किंवा फ़्ल्यामबॊयंट ट्री [ Flamboyant ] म्हणतात. याच जोडीला ईग्रजीमधे याला गोल्ड मोहोर नी रॊयल पॊइनसियाना [ Royal Poinciana ] अशीही नावे प्रचलीत आहेत. बहुतेक सर्व भारतिय भाषांमधे गुलमोहोराला नावे आहेत याचाच अर्थ, आपल्या देशात हे झाड सर्वत्र रुजलेलं आहे.बहावा, चिंच, कांचन यांच्या “सिसालपिनीएसी कुळात” [ Family: Fabaceae Subfamily: Caesalpinioideae ] या झाडाचा समावेष होतो. याच शास्त्रिय नाव आहे “डेलोनिक्स रेजिया” [ Delonix regia ]. डेलोनिक्स म्हणजे ह्याच्या फ़ुलाच्या आत असलेल्या ठळकपणे दिसणार्या हूक्स सारख्या टोकदार वळलेया नख्या आणि रेजिया म्हणजे राजेशाही.

gu3

गुलमोहोराबद्दल काय सांगायच? त्याचं पानं गाळणं, निष्पर्ण होणं नी फ़ुलं फ़ुलणं अगदी बघण्यासारखं असत. हे झाड साधारंण २० मिटर उंच वाढतं. साधारंण ७० ते ८० सेमी चा व्यास असलेलं याच राखाडी तपकिरी रंगाच खोड बर्यापैकी गुळगुळीत असतं. तीच गोष्ट याच्या फ़ांद्यांचीपण असते. त्यापण बर्यापैकी गुळगुळीत असतात नी त्याच रंगाच्या असतात. याची पानं खूप मोठी तर असतातच पण त्याच्या पर्णिका बर्यापैकी झिरझीरीत झिपरी असतात. या झिपऱ्या पानांकडे पाहिलं की लहानपणी केलेले चाळे आठवतात. लहानपणी पानाच्या देठाकडे पकडून दोन बोटांच्या चिमटीत सर्र्र्र्र्कन पानं ओढून गोळा करून हुर्र्र्र्र्र्र्र्र करून वर भिरकावलेली व्यक्ती न मिळणं विरळाच. याचा जोडीला, येताजाता पावसाळ्यात याच्या फ़ांदया ओढून, मागुनं येणार्या व्यक्तीच्या अंगावर पावसाचा शिडकावा पाडलेला असतोच असतो. लहानपणीचा अजून एक आवडता खेळ म्हणजे याच्या फ़ुलातल्या नख्या एकमेकांमधे अडकवून राजाराणीचं बैठं युद्ध खेळायच. मला तर आठवतय, भातुकली खेळताना याच्या टप्पोऱ्या कळ्या आम्ही चिरून भाजी भाजी खेळायचो. याच जोडीला फुलातली पांढरी पाकळे, अर्थात कोंबडा पण खायला वापरायचो. गेले ते रम्य बालपणीचे दिवस नी गेला तो अंगणातला गुलमोहोर ! असो. थंडीला सुरुवात झाली की याची सगळी पानं गळून पडतात. मग हळूहळू, सरत्या वसंत ऋतूत याला नाजूक पालवी फ़ुटायला लागते. आणि जणू सगळ झाडं हिरवट पोपटी शालू नेसून फ़ुलायला तयार होतं.

gu4gu5

आपल्याकडे साधारण मार्च मधे थंडी संपलेली असते. गुलमोहोराचा फ़ुलण्याचा काळ म्हणजे एप्रिल ते सरता जून.याची फ़ुलं खुप लाल भडक नी चित्ताकर्षक असतात. या फ़ुलांचे गुच्छ फ़ांद्यांच्या टोकांना येतात. फ़ुगीर नी गब्बू कळ्या खालून वर उमलत जातात. हे फ़ुल साधरण १० सेमी असतं.सुट्या पाकळ्या साधारंण पाच असतात. त्यात सुट्टे पुंकेसर असतात. आणि सगळ्या पाकळ्या साधारण लहानमोठ्या असतात. यातल्या चार पाकळ्या लाल, केशरी किंवा भगव्याची रंगाची छ्टा असलेल्या असतात.मात्र एकच पाकळी अगदी वेगळी असते. ती एकतर पिवळट असते किंवा पांढरट असते. या वेगळ्या पाकळीवर लाल रंगाच्या रेषा असतात.[ या पाकळीला बहुतेक ठिकाणी कोंबडी म्हंटल जातं ]. काही ठिकाणी चक्क पिवळा गुलमोहोरही पहायला मिळतो. या फ़ुलांना खास वास असा नसतोच पण अगदी दीर्घ श्वास घेऊन हे फुल हुंगल तर एक कडसर वास सहज जाणवतो.

gu6gu7

आपल्याकडे पावसाळा हा पुर्ननिर्मितीचा उत्सव असतो. निसर्गातली बहुतेक सर्व झाडं या ऋतूत पुढच्या पिढ्यांची तयारी करत असतात. या झाडाला पावसाळ्यात चप्पट हिरव्या लांबलांब शेंगा लागतात. साधारण हातभर झाल्यावर या शेंगा हिवाळ्यात सुकतात नी खुळखुळ वाजतात. या खुळखुळ वाजणार्या काळपट शेंगेत काळसर चपट्या अश्या ३० /४० बिया असतात. या बियांमधून गुलमोहोराची रोपं बनतात. आधुनिक पद्धतीनेपण रोपं तयार करतात नी लौकरात लौकर म्हणजे ३ /४ वर्षात हे झाड फ़ुलायला सुरुवात होते. जिथे जिथे हा वृक्ष गेलाय, तिथे तिथे ह्याचा उपयोग फ़क्त उद्यानाच्या शोभेसाठीच केला गेलाय. बाकी देवपुजेसाठी किंवा घरात शोभेसाठी याच्या फ़ुलांचा वापर कोणीच करत नाही. तीच गोष्ट याच्या लाकडाचीपण आहे. लाकडाच्या कुठल्याही व्यवसायासाठी हे लाकूड कुचकामी असते कारण ते टिकावु नसते. सुरुवातीलाच लिहिल्याप्रमाणे हे झाड परदेशी असल्याने आपल्या पक्षांना हे झाड कायम परकेच वाटत आलय नी त्यावर कोणीही घरटे करत नाही. अगदी क्वचित कावळे त्यांच अस्त्याव्यस्त घरटं या झाडावर बनवतात .

gu8

आपल्याकडे सोसाट्याचा वादळ वारा आल्यावर अनेक ठिकाणी जी झाडं पडतात त्यात गुलमोहोरची संख्या जास्त असते . याच कारण या झाडाची आधारमुळे [बट्रेस्ट रूट्स] जमिनीच्या वरवरच्या थरात रहतात त्यामुळे आसपासच्या फ़रशा पटपट उचकटल्या जातात. ह्या झाडाची मुळं खुप खोलपण जात नाहीत. सहाजिकच सोसाट्याच्या वाऱ्यासमोर हे झाड जमिनीत घट्ट मुळं रोवून उभं राहू शकत नाही. सगळ्यात मोठ म्हणजे, या झाडाच कचरा फ़ार होतो नी तो खतासाठी फ़ारसा उपयोगी नसतो. जाता जाता सांगायची ठळक गोष्ट म्हणजे ज्या मादागास्कर बेटावरून मधून हे झाड आलय ना, तिथेच आता हे झाड चक्क नामशेष झालय…. है ना मजे की बात?

या परदेशी झाडांना पाहिलं की मनात काही विचार कायम येतात. १८ व्या शतकाच्या म्हणजे याच्या आगमनाआधी आपल्याकडे शुद्ध भारतिय वृक्ष नव्हते का? होते ना?आपली वनं, अरण्य़ं नी जंगलं ओस पडली होती का? नाही ना? मग आताच ह्या गुलमोहोरांच एवढ प्रस्थ का? तो पट्कन वाढतो म्हणुन? हल्ली झट्पट इन्स्टंट च्या जमान्यात आपल्याला झाडंपण इन्स्टंट हवी आहेत का? उत्तर नाही असं असेल तर मग चला ! एकतरी शुद्ध भारतिय झाड लावूयात . आणि जेव्हा १००% भारतीय झाड लावाल, तेव्हा मला कळवा . म्हणजे त्या झाडाच्या पहिल्या वाढदिवसाला शुभेच्छा द्यायला न विसरता मी तो दिवस लक्षात ठेवेन…..

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s