तामण /जारुल [ Lagerstroemia reginae ]

आज १ मे … महाराष्ट्र दिन . माझा महाराष्ट्र ज्यातलं जैव वैविध्य जगभर प्रसिद्ध आहे. आजचं लिखाण अर्थात माझ्या महाराष्ट्राच्या मानचिन्हाबद्दल. प्रत्येक राज्याचे प्राणी, झाड, फ़ुल असे चिन्ह असते. महाराष्ट्राचं राज्यिय फ़ुल आहे जारूल/ तामण जे सध्या अनेक ठिकाणी फ़ुललेलं दिसतय.

jarul9jarul1

प्राईड ऑफ ईंडिया, क्विन ऑफ फ्लॉवर , जायंट क्रेप मर्टल अशी विविध ईंग्रजी नावं मिरवणारं हे सुंदर फ़ुल आपल्या राज्याचं फ़ुलं म्हणुन ओळखलं जातं. पळसाचा सरता पुष्पोत्सव भर उन्हाळ्यात तामणाला जणू खो देतो नी हे मध्यम आकाराच हिरवं डेरेदार झाड जांभळट गुलाबी फ़ुलांनी बहरुन जातं. १००% भारतिय असलेलं हे सुंदर झाडं महाराष्ट्राच्या बहुतेक सर्व भागात आढळतं. हिंदी भाषेत जारुल म्हणुन ओळखलं जाणारं हे झाडं आपल्या विदर्भाकडेही जारूल म्हणुनच ओळखलं जातं. कोकणात याला मोठा बोंडारा म्हणतात कारण याला जी फ़ळं येतात ती मोठ्या बोंडासारखी दिसतात. ” ल्यॆगरस्ट्रोमिआ रेगिनी ” [ Lagerstroemia reginae ] असं वनस्पतीशास्त्रिय नाव धारण केलेलं, मेंदीच्या कुटुंबातलं [लिथ्रेसी – Family Lythraceae] हे झाड एका स्विडिश निसर्ग अभ्यासकाच्या नावाचं [ Magnus von Lagerstroem ] स्मरण आहे. प्रसिद्ध वनस्पती शास्त्रज्ञ लिनियस [ Carl Linnaeus ] याला या झाडाचे नमुने लॆगरस्ट्रोमने नेउन दिले म्हणुन आपल्या मित्राच्या सन्मानार्थ त्याने या झाडाचे नाव ठेवले. साधारण ५० ते ६० फ़ुट ऊंच वाढणारं हे देखणं झाड लांबुळक्या पानांनी समृद्ध असतं. साधारण १० ते १५ सेमी लांबीची वरुन हिरवीगार नी खालच्या बाजूने फ़िक्कट हिरवी पानं आणि गुलाबी जांभळी फ़ुलं हे या झाडाच वैशिष्ठ म्हणता येउ शकतं.या झाडाची साल साधारण पिवळट भुरकट रंगाची आणि गुळगुळीत असते. या सालीचे नियमित पापुद्रे गळून पडतात अगदी पेरुच्या झाडासारखे. हिवाळ्यात बहुतांश झाडांप्रमाणे ह्याही झाडाची पानं तांबडट होवुन गळून पडतात.

jarul3jarul2

वसंतात नाजूक कोवळी पानफ़ुट सुरु होतानाच फ़ुलांनाही बहर यायला सुरुवात होते. निष्पर्ण फ़ांद्यांच्या टोकाला साधारण २५/३० सेमी लांब फ़ुलाचे घोस यायला सुरुवात होते. या जांभळट गुलाबी फ़ुलांच वैशिष्ठ्य म्हणजे ही खालून वर उमलत जातात. पुर्ण उमललेली ५/६ सेमी ही फ़ुलं जणू गुलाबी झालरींचा गुच्छच वाटतो. साधारण ६/७ झालरींच्या गुलाबी जांभळ्या पाकळ्या व त्यात उजळ पिवळ्या रंगाचे नाजूक पुंकेसर हे तामणीचं वैशिष्ठ्य म्हणता येऊ शकतं. या फुलांच अजून वैशिष्ठ्य सांगायचं म्हणजे प्रत्येक फुल फुलायला साधारण २ ते ३ तास लागतात. संशोधन सांगतं की ही फ़ुलं जास्तीतजास्त २/३ दिवसच फुललेली रहातात . यांतील मध खाण्यासाठी मध माशांच्या जोडीने भुंगे देखील गर्दी करतात. उन्हाळ्याच्या शेवटी या झाडाची फ़ळं अर्थात बोंड धरायला सुरुवात होते. साधरण ३ सेमी आकाराची होणारी ही फ़ळं टोकाकडे टोकदार नी वर कडक आवरण असलेली ठळकपणे दिसून येतात. ही फ़ळं सुकल्यावर साधारण काळसर तपकिरी होतात. या सुकलेल्या बिया अगदी पातळ चपट्या असतात. या बियांना म्हातारीच्या बियांसारखे कापूस पंख असतात जे त्यांना बीज प्रसारासाठी दूरदूर वाऱ्यावर वाहून घेउन जातात.

jarul4jarul8

तामण झाडाचं लाकूड उत्तम या सदरात मोडतं. मजबूत म्हणुन ओळखलं जाणारं हे लाकूड लालूस चमकदार छटेचं असतं. अनेक मोठ्या बांधकामांसाठी यांचा वापर केला जातो. या झाडाचे अनेकाविध उपयोग आहेत . याच्या सालींचा उपयोग आयुर्वेदात ताप उतरवण्यासाठी केला जातोच पण याची पाने देखील उपयोगी समजली जातात. यात असलेल्या कोरोसॊलिक आम्लामुळे या पानांचा वापर पुर्वेकडच्या अशियन देशांमध्ये चहामध्ये केला जातो. फ़िलिपाईन्स या देशात तर चक्क याचा उल्लेख सरकारी झाडं असं केला जातो.आपल्याकडे या झाडाचा उपयोग हल्ली मुख्यत्वे सुशोभिकरणाचा वृक्ष म्हणुनच केला जातो. हे झाड अगदी सहज कुठेही रुजते नी फ़ुलते. महाराष्ट्रातच नाही तर संपुर्ण भारतात हे झाडं फ़ुलतं. मात्र विविध भागातल्या हवा, पाणी व जमिनीच्या फ़रकांमुळे याच्या फ़ुलांच्या रंगछटांमध्ये वैविध्य जाणवतं. भारतीय टपाल खात्याने या झाडाच्या सन्मानार्थ टपाल तिकीट काढलेलं आहे.

jarul7

आज महाराष्ट्र दिन… “कणखर देशा, राकट देशा, दगडांच्या देशा ” अशी बिरुदावली अभिमानाने मिरवणाऱ्या राज्याचं राज्यिय फ़ुलं इतकं सुंदर नी झाड इतकं देखणं असु शकतं यावर जणू विश्वासच बसत नाही. मी डेहेरादूनला शिकत असताना, जेव्हा केव्हा तामण समोर यायचं, तेव्हा मनाला न चुकता सह्याद्रीमधुन फ़िरवुन आणायचं. सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या थेट निसर्गातून खुप शुभेच्छा. या पावसाळ्यात एकतरी तामण लावुन ती वाढवुया. जय महाराष्ट्र.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s