मुचकुंद [ Pterospermum acerifolium ]

एका मित्राने खुप दिवसांपुर्वी ह्या झाडाबदल लिहायला सुचवले होते. अर्धवट लिहुन ठेवलेला तो लेख उन्हाळा स्पेशल लिखाणात मागे राहून गेला. खुप वाचकांनी ह्याबद्दल लिहावे असे सुचवल्याने आज मी पुन्हा एकदा १००% भारतिय झाडाकडे वळलेय.

OLYMPUS DIGITAL CAMERAM2

मुचकुंदाच झाड कसं दिसतं हेच मुळी अनेकांना माहित नसतं. अनेकजणं कुडाच्या झाडाला मुचकुंद समजण्याची चुक करत असतात.कनकचंपा , कनियर , काठचंपा अशा हिंदी नावांनी ओळखला जाणारा हा विशाल, सदाहरीत वृक्ष आपल्या सह्याद्रीच्या व पश्चिम घाटाच्या जंगलाचा अविभाज्य घटक आहे. टेरोस्पर्मम ऐसरीफ़ोलियम [ Pterospermum acerifolium ] असं दांडगं वनस्पतीशास्त्रिय नाव मिरवणारा मुचकुंद जंगली बदामाच्या कुळात , अर्थात स्टर्कुलिएसी कुळात [ Pterospermum] समाविष्ट आहे. साधारण २० मिटर उंच होणारा हा वृक्ष भरपुर डेरेदार दिसतो. ह्या डेरेदार झाडाची गम्मत अशी आहे की याच्या जाडजुड बुंध्याला अगदी थेट जमिनीजवळच अनेक नविन फ़ुटवे येतात आणि अनेकदा बघताबघता या झाडाचं चक्क बेट बनतं. मुचकुंदाचं झाड मजबुत असलं तरिही याची साल करडट काळसर रंगाची असते. जसंजसं हे झाड जुनं होत जातं तसंतसं ही साल रखरखीत भेगायुक्त होवुन जाते.

M1M3

मुचकुंद हे गमतिशीर नाव धारण केलेल्या झाडाला लांबुनही ओळख देणारी गोष्ट म्हणजे त्याची मोठ्ठी पानं. साधारण ३०/४० सेमी असणारी ही पानं खुपच ठळक या सदरात मोडतात. तळाला भुरकट पांढरट असणारी ही पसरट पानं वरच्या अंगाला चकचकीत हिरव्या रंगाची असतात. पानाच्या तळाला मऊमऊ धुरकट पांढरट लव असते. ही पानं अगदी अनियमित, वेगवेगळ्या आकारात पण टोकदार कोपरे असलेली असतात. या मजेशीर पानांचा साधारण २०/३० सेमी लांबीचा देठ पानाच्या मध्यभागी कधीच जोडलेला नसतो तर थोडासा वरच्या अंगला उचलून जोडल्यासारखा दिसतो. मॊर्फ़ॊलॊजी मध्ये [रचनाशास्त्र] या प्रकाराला ’पेल्टेट लीफ़ म्हणतात.

फ़ोटोतलं फ़ुल पाहून काल अनेकांनी मला याबदल बरेच प्रश्न विचारले. मुचकुंदाची फ़ुलं खुप सुंदर नी अगदी वैषिठ्यपुर्ण अशीच असतात. साधारण २० सेमी होणारी ही फ़ुलं अगदी वेलची केळी सोलुन ठेवल्यासारखी दिसतात. पाच नाजूक लांब व सुवासिक पाकळ्यांच हे फ़ुल अगदी सुकुन पिवळट पडलं तरीही त्याला सुवास येतच रहातो. या फ़ुलाचा बिजांड कोश केसाळच असतो. सरत्या पावसाळ्यात ही फ़ुलं भरभरून फ़ुलतात नी थेट वसंत ऋतूपर्यंत हा बहर सुरुच असतो.याच जोडीला मुचकुंदाला फ़ळं धरायला सुरुवात होते. साधारण १५ सेमी लांब होणारं हे पाचधारी लवयुक्त खडबडीत फ़ळ झाडावरच सुकतं. यातल्या बियांना पंख असतात ज्या वाऱ्याबरोबर बी ला तरंगत दूर दूर नेण्याचं काम करतात. वनस्पतीशास्त्र तसं पहायला गेलं तर किचकट वाटतं. आता हेच पहा ना , मुचकुंदाचं झाड म्हंटलं की आठवतं ह्याच्या टेरोस्पर्मम या प्रजातीनामाचा अर्थ आहे पंख असलेल्या बिया असलेला. अर्थात ज्याच्या बिया वाऱ्यावर दूर दूर जातात तो.

M9M4

डिनर प्लेट ट्री, मॆपल ट्विस्ट, बयुर अशा इन्ग्रजी नावांनी ओळखल्या जाणाऱ्या ह्या झाडाचे उपयोग बरेच आहेत. या झाडाचं लाकूड तसं टिकावू समजलं जात असल्याने फ़र्निचर बनवण्यासाठी वापरात येतं. याचा अजुन एक उपयोग म्हणजे, प्लायवूड बनवण्यासाठी देखील हे वापरले जाते. लाकडाची खेळणी बनवण्यासाठी, काड्यापेट्या बनवण्यासाठी हे झाड उत्तम समजले जाते. आदिवासी लोकांमध्ये, आव थांबण्यासाठी याच्या पानांचा उपयोग केला जात असल्याच्या नोंदी आहेत. मुचकुंदाची फ़ुलं किटकनाशक म्हणुन वापरली जातात. रक्त दोषावरदेखील ही फ़ुले काही ठिकाणी वापरली जातात. याच्या पानांचा वापर पत्रावळीसारखा केला जातो म्हणुन डिनर प्लेट ट्री हे नाव रुढ झालय. भारतीय टपाल खात्याने या देखण्या झाडावर व फुलावर टपाल तिकिट व प्रथम दिवस आवरण प्रकाशित करून आपल्या झाडाला जगभर नेलंय .

M7M8

कर्नाटाकातल्या शिरसीच्या जंगलात मी या वृक्षाला फ़ुललेलं पाहिलय . अतिशय देखणं दिसणारं हे झाड साधारण उष्ण हवामानात, लख्ख सुर्यप्रकाश व भरपुर पाणी असलेल्या ठिकाणी मस्त वाढतं. शासनाच्या सामाजिक वनिकरणाच्य रोप वाटिकांमध्ये बियांपासून तयार केलेली याची रोपं उपलब्ध होऊ शकतात. भरभर उंच होणाऱ्या या झाडाला साधारण २/३ वर्षात फ़ुलं यायला सुरुवात होते.आज १००% भारतिय झाडं परिसरात लावणं गरजेचं आहे. परिसर सुशोभित, सुगंधी करु इच्छिणाऱ्या वृक्ष वेड्यांनी मुचकुंदाचा पर्याय या पावसाळ्यात निवडायला हरकत नाही.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s