रक्ताशोक किंवा “खरा अशोक”- [ Saraca asoca ]

मध्यंतरी माझ्या लेकीने ,आभाने लायब्ररीमधून ईग्लिश “रामायणा” हे पुस्तक वाचायला घरी आणलं होतं. त्या पुस्तकाच्या कव्हरवर सीता अशोकाच्या झाडाखाली बसून विलाप करतेय असं चित्र होतं. ते पुस्तक ईंग्रजी माध्यमाच्या लहान मुलांसाठी योग्य होतं पण त्यात काहीतरी खटकत होतं. मलाच कळेना काय खटकतय? तेवढ्यात आभा म्हणाली, “आयु, डू यु थिंक सो सीता ह्या झाडाखाली बसली असेल? हनुमानाने ह्या झाडावरून उडी कशी मारली असेल? ह्याला तर ब्रान्चेसच नाहीत”. तेव्हा जाणवलं की मला काय खटकतय? खटकत होतं ते सीतेच्या मागे असलेलं झाड क्रिसमसला हिरवे कागद उभे उभे कापून चिकटवतात तस उभ अशोकाच झाड होतं. त्याला फ़ांद्याच नव्हत्या.कस काय हे झाड सीतेवर सावली धरणार? कशी ती त्याखाली बसून विलाप करणार नी कसा तो वायुपुत्रं त्यावरून उडी मारणार? आभाला पडलेला प्रश्न किती जणांना पडतो? खरं सांगायचं तर अनेकदा हे कव्हर मी पाहिलं होतं पण मलाही हा प्रश्न पडला नव्हता. माझा आजचा लेख सीतेच्या खऱ्या अशोकावर लिहितेय जो खरा अशोक आहे.

ashok4

आपल्याकडे दोन प्रकारचे अशोक मिळतात. आपल्याला पुर्वीपासून माहित असलेला सीतेचा अशोक.ज्याला “रक्ताशोक किंवा “खरा अशोक” म्हणतात. १००% भारतिय झाड आहे हे. वनस्पतीशास्त्रात ह्याला “सरका असोका” [ Saraca asoca ] किंवा “सरका इंडिका”  असं म्हणतात. गम्मत म्हणजे हे झाड बहावा, चिंच यांच्याच कुळातल आहे. असोका हे नाव मुळच्या अशोक ह्या नावावरून आलय नी इंडिका म्हणजे इंडियन म्हणजेच भारतिय. आपल्या देशात बहुतेक सर्वत्र हे झाड उगवतं. आपल्याच देशाबरोबर श्रीलंका, मलेशिया ब्रम्हदेश या शेजारी देशांमधे पण हे झाड भरपूर पहायला मिळतं. याचं इंग्रजी नाव Sorrowless tree अगदी “ज्याला शोक नाही असां तो अशोक” ह्याच शब्दश: भाषांतराच जणू. अशोकाच्या सौन्दर्याची अनेक वर्णनं आपल्या संस्कृत लिखाणात आढळून येतात. रावणाच्या बागेत फ़ुललेला तो हाच अशोक ज्याच्या वाटिकेत, अर्थात अशोक वाटिकेत सीतेने शोक केला ! आता ह्याच्या खाली बसून असं म्हंटल की त्याची उंची काय? हा प्रश्न आहेच. साधारण दहा मिटर उंच होणारं हे झाड अगडबंब होत नाही. डेरेदार, पसरट नी झुकलेल्या फ़ांद्या जणूकाही शालिनतेने सावरून उभं राहणार हे झाड खुप सुंदर दिसतं.याची फ़ुलं तर सुंदर असतातच पण पानांना सुद्धा निसर्गाने अती सुंदर बनवलय. एकाआड एक अशी उगवणारी पानं मोठी चकचकीत हिरवीगार असतात.

ashok1ashok6

सिसालापेनिसी कुळातल्या [ Caesalpinioideae ] ह्या झाडाला याला पालवी फ़ुटते ना तेव्हापण हे झाड खुपच देखणं दिसतं.पानांचा बहर येताना फ़ुटलेली पालवी धुरकट करडी असते. मग ती नाजूक कोवळी पालवी किरमीजी लाल, मग राणी झाक असलेला गुलाबी लाल मग पोपटी आणि शेवटी हिरवीकंच होतात. ह्याचा फ़ुलण्याचा काळ साधारण फ़ेब्रुवारी मार्च ते मे मधे असतो. काही वेडे अशोक सरत्या पावसाळ्यात ऑक्टोबरमधेपण फ़ुलतात. ह्याची फ़ुलं म्हणजे निसर्गातली एक गम्मत आहे. यांना पाकळ्याच नसतात. डायरेक्ट फ़ुल उमलतं. साधरण दिड दोन सेमी आकाराची ही फ़ुलं उमलताना पिवळ्या रंगाची मग भगवी नारंगी आणि शेवटी लाल रंगाची होतात.कुंडीमधे लावलेल्या शोभेच्या एक्झोरा फ़ुलांच्या घोसासारखे याच्या फ़ुलाचे घोस दिसतात. यांना ७/८ पुंकेसर असतात.आणि वास पण भन्नाट वेगळाच असतो. अतिशय सुमधुर असा मध याच्या फुलांमध्ये असतो. एकदा का ही फ़ुलं फुलली की किड्यांची मधमाशांची अगदी लगबग सुरु होते याच्या अवतीभोवती मध खाण्यासाठी.

ashok7

फ़ुलांपाठोपाठ उन्हाळ्यात धरलेल्या शेंगा साधारण पावसाच्या सुमारास वाळतात.प्रचंड मोठ्या नाही पण साधारण १०/ २० सेमी लांब असणाऱ्या याच्या शेंगा साधारण ५/७ सेमी रुंद असतात. मग तुम्हीच सांगा, अशा लहानसर शेंगाना मोठ्ठ्या कोण म्हणणार? प्रत्येक शेंगेत ना साधारण ५ /८ काळसर राखाडी बिया असतात. ह्या बिया पट्कन रुजून चटकन फ़ुलणार गुणी झाड म्हणुन बिनदिक्कत सीतेच्या अशोकाकडे बोट दाखवता येतं. . गम्मत सांगते, प्रत्येक राज्याच एक झाड असतं. हे झाड कित्ती नशिबवान आहे , ह्याला उत्तर प्रदेशच राज्यिय झाडाचा मान मिळाला आहेच पण त्याच जोडीला, ओरिसा राज्याच्या राज्यिय फ़ुलाचापण मान मिळाला आहे. अशी फार थोडी झाडं आहेत ज्याला एकाहून जास्त राज्यांनी सन्मान दिलाय .

ashok8ashok2

प्रत्येक झाडाच्या औषधी उपयोगा प्रमाणेच सीतेच्या अशोकाच्या उपयोगाचा विचार केला तर ह्या झाडापासून भरपूर औषधं बनतात. गडद तपकीरी रंगाच खोड नी गुळगुळीत असलेली याची साल बहुगुणी समजली जाते. प्रसिद्ध अशोकारिष्ट नी अशोककल्प ही आयुर्वेदिक औषधं ह्याच्याच सालीपासून बनतात.या झाडाची अतीव सुंदर दिसणारी ही नाजूक फ़ुलं स्त्रियांच्या पोटाच्या दुखण्यासाठी वापरतात. यांचा अजून एक सर्वसामान्य वापर म्हणजे खास करून रक्ती आव होत असेल तर ही फ़ुलं उकळून अर्क बनवून दिला जातो. आणि हो, मुत्रमार्गाच्या विकारांसाठी याच्या बिया वापरतात. आता तुम्हीच सांगा , आहे ना गुणी झाड हे ? म्हणुनच मला हे झाड खूप आवडतं. दुर्दैवाने आपल्याकडे या झाडाची खरी ओळख झालीच नाही अस वाटतं. आपल्याकडे याची फ़ुलं देवपुजेसाठी एवढी वापरली जात नाही , पण दक्षिण भारतात नी पुर्वेच्या राज्यांमधे यांचा वापर पुजेसाठी केला जातो. जनककन्येमुळे आपल्याला हे पवित्र वाटतच पण राजपुत्र सिद्धार्थाचा जन्म याच झाडाखाली झाला असं मानतात त्यामुळे, बौध्द धर्मियांनापण हे झाड पुज्य आहे. आणि हो, जैन धर्मात भगवान महाविरानी याच्या सावलीत बसून हितोपदेश केले आहेत म्हणुन त्यांनापण ते पवित्र आहेच.

ashokacover

या झाडाला प्रचंड आकार नसल्याने अर्थात याचं लाकूड मोठ्या कामांसाठी वापरलं जात नाही. मुळातच धार्मिक महत्व प्राप्त झाल्याने या झाडाची तोड कमीच होते. पाश्चिम घाटात आणि अर्थातच सह्याद्रीच्या जंगलातही सहज आढळणाऱ्या ह्या झाडाच्या वाळक्या गळून पडलेल्या फ़ांद्यांना जळावू म्हणून गिरीजन वापरतात. बाकी शहरात या झाडाचा वापर सुशोभीकरणासाठीच जास्त होतो. अंगोपांगी फुललेला अशोक पहाणं या सारखं नेत्र सुख नसाव अशा मताची मी आहे . शुद्ध भारतीय झाडं एकाआड एक लावून अनेक भाग सुशोभित केलेले मी पाहिले आहेत. यात सीतेचा अशोक मुबलक आढळला आहे. आपल्याकडे मिळणारं हे सदाहरीत झाड लोकांना माहित का नाही हेच कळत नाही. आज गरज आहे ती डोळसपणे निसर्ग संवर्धन करायची. पावसाळ्यात डोंगरांवर, घाटात बिया उधळणारे अनेक निसर्गप्रेमी मला माहित आहेत . अगदी उत्तम काम ! पण एकच कळकळीची विनंती मी जाताजाता करू इच्छितेय. या पावसाळ्यात जमलं तर १००% भारतीय झाडांच्या बियाच निसर्गाला भेट द्या. आपल्या जंगलांना या झाडांची व झाडांना आपल्या मातीची जिवाभावाची ओळख असते. या निसर्गदत्त ओळखीमुळे अशा बियाना रुजायला फुलायला सहज शक्य असतं. अशाने आपल्या हातून निदान एखादंतरी १००% भारतीय झाड रुजायला मदत होईल. आता मी माझा हा फ़ाफ़ट पसारा आवरता घेतेय. पुढच्या लेखात मी दुसर्या अशोकाबद्दल लिहिन, तो पर्यंत सीतेचा अशोक शोधता येतोय का पहा ।

OLYMPUS DIGITAL CAMERA

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s