ताडगोळा- अशियन पाल्मायरा पाल्म्स’ [ Asian palmyra palm, toddy palm, sugar palm]

उन्हाळा स्पेशल ’ लिहायला लागल्यावर मला बरेच जणं विचारतात की “कस काय बुवा हे लिहायला सुचतं?” असा प्रश्न विचारणाऱ्या प्रत्येकाला माझं हे उत्तर…. “उन्हाळा दरवर्षी येतो, फ़ळं पण दरवर्षी येतात. त्यातल्या बहुतेकांची आठवण, चव आपल्या लहानपणाशी घट्ट जोडलेली असते. ह्याच आठवणी आणि मेसेजेस मला लिहायला सांगतात”. आजचं फ़ळ आहे ताडगोळा. मागच्या आठवड्यात माझ्या एका मैत्रिणीने हे फळ बंगलोर शहरात पहिल्यांदा खाउन पाहिलं. त्याचे फ़ोटो तिने पोस्ट केले आणि मला त्याबद्दल लिहायला सांगितलं. या ताडगोळ्याशी माझ्या लहानपणीच्या खूप आठवणी जोडल्या आहेत.

taad 1

पुर्वी उन्हाळ्यात मिळणारं हे फ़ळं हल्ली उन्हाळ्याच्या आधीपण मिळतं नी त्यामुळे त्याच अप्रूप जरा कमी झालय असं वाटतं. १००% भारतिय असलेलं हे झाड भारतिय उपखंडात सररास मिळतं.’अशियन पाल्मायरा पाल्म्स’ [ Asian palmyra palm, toddy palm, sugar palm] नावाने ओळखलं जाणारं हे झाड पाल्म वृक्ष [ उच्चार पाम असा करतात ] गटामधलं एक सदस्य झाड आहे. याच वनस्पती शास्त्रिय नाव आहे Borassus flabellifer. साधारण १०० फ़ुटांपर्यंत वाढणारं हे झाड जन्माला येतानाच शतायुषी भव असा आशिर्वाद घेउन येत असेल. कारण साधारण १०० वर्षे तरी हे झाड जगतच जगतं. सुरुवातीस अगदी हळू हळू वाढणारं हे झाड नंतर फ़टाफ़ट वाढतं. पुर्ण वाढीच झाड साधारण १५ ते १८ मिटर्स पर्यंत वाढत. नारळाच्या खोडासारखाच, अर्थात सिलेंडर सारखा बुंधा असलेलं याच खोड अगदी रखरखीत नी मळकट असतं. डोक्यावर गोलाकार झावळ्या तुऱ्यांसारखं मिरवणारं हे झाड अगदी लांबूनही नजरेत भरतं. या झाडाला जर निट पाहिलं तर तुमच्या लक्षात येइल की नारळाची झावळी लांबसडक असते तर ह्याची झावळी लांब दांड्याच्या पंख्यासारखी. या पानांचा उपयोग झोपड्या शाकारण्यासाठी, टोपल्या, पंखे,चटया आणि हस्तकलेच्या वस्तू बनवण्यासाठी होतो. दक्षिणेकडे या पानांवर पुर्वीची तामिळ महाकाव्य लिहिली गेली आहेत हे विषेश. या पानांचा उपयोग, पारंपारीक तामिळ पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. सुगरण पक्षांच तर हे आवडतं झाड. याच्या झावळ्या म्हणजे त्यांच हमखास खोपा बांधायच आवडतं ठिकाण म्हणता येऊ शकतं.

taad2taad4

अशा या रखरखीत नी चिव्वट झाडाला साधारण उन्हाळ्याच्या सुरुवातीला मार्च ते एप्रिल व थंडीतही फ़ुलं येतात. याच फुलांमधून पुढे बनतं ताडाचं फ़ळ म्हणजेच ताडगोळा. घोसाघोसानी येणारं हे प्रत्येक फ़ळ साधारण ३/६ इंच मोठं असतं. याच्यावरचा भाग काळसर भुरकट आणि अतिशय कठीण असतो. हा कठीण भागच आतल्या लुसलुशीत ताडगोळ्याला जपतो. हे कठीण कवच सोलणं म्हणजे जिकिरीच काम असतं . पण एकदाका ते सोललं की आत दुधाळ रंगाचा तीन कप्प्यात असलेला ताडागोळा मिळतो. ह्या दुधाळ फ़ळावर पुन्हा एक मातकट राखडी रंगाचं अजुन पातळ साळ असतं. जे काढल्यावर आतला दुधाळ पाणेरी ताडगोळा खायला मिळतो. हे वरच नाजूक सालपण खाता येतं पण त्याला ना तुरट चव असते. ह्या मांसल नी रबरबीत ताडगोळ्याच्या आत नारळासारखं थोडसं, पण गोड पाणी असतं. गोळा सोलणाऱ्याच कौशल्य ह्यातच असतं की गोळा न फ़ोडता, पाणी न सांडता अख्खा काढायचा. अनेकांना बंगाली मिठाया आवडतात. बहुतेकांना आवडणारी संदेश मिठाईच उगमस्थान आहे हा ताडगोळा…. त्याच्याप्रमाणेच ही मिठाई बनवली जाते. आत गोड नी वर थोडीशी कडक. आजमितीस बंगाली नी तमिळ लोक या ताडगोळ्याचे जास्तीतजास्त पदार्थ बनवतात. आपण शक्यतो ह्याला फ़ळ म्हणुनच खातो.

taad5taad3

मला माहित आहे हे लिखाण लांबलय. पण जाताजाता सांगायच म्हणजे याच झाडाच्या [ Female Palm ] कोवळ्या शेंड्यांवर चिरा देऊन तिथे मडकं बांधतात. त्यातून निघणारा चीक म्हणजे अर्थात निरा…. ह्याच निरेला आंबवून ताडी नामक देशी दारू बनवली जाते. ताडगोळ्याचा सर्वात महत्वाचा औषधी गुणधर्म म्हणजे शरीरातली उष्णता कमी करणे.ताडगोळा खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो. ह्यातील तंतूमय पिष्ट पदार्थ आतड्याला चांगलच कामाला लावतात बर का ! याचा अजून एक गुण म्हणजे मलावरोध कमी करण. इंडोनेशियात ताडफ़ळ, निरा स्वयंपाकात वापरली जाते. अनेकांनी पर्यट्नाला गेल्यावर तिकडे या ताडगोळ्याची करी खाल्ली असतेच. या झाडाच्या प्रत्येक भागाचा उपयोग माणसाला अवगत आहे. ताडाच लाकूड चिव्वट समजल जातं. कंबोडिया देशात याच्या मुबलक उपलब्धतेने तिथल्या लहान आकाराच्या होड्या याच्या पासूनच बनतात. कुंपणासाठीचे लाकूड म्हणुनही याचा उत्तम वापर होतो.अगदी लहान ताड जर तुटला तर याची शिजवून भाजीपण केली जाते. याच्यात असलेलं पिष्टमय तंतूंच प्रमाण हे अतिशय उत्तम समजलं जातं. ताडाच्या भाजलेल्या बिया हे श्रीलंकेतलं आवडतं खाणं समजलं जातं. आपण फक्त ही फ़ळंच खातो पण ताडाचे कोवळे कोंब, कोवळी पानं ही सुद्धा खाण्यासाठी योग्य असतात नी खाली दक्षिणेकडे त्यांच्या बऱ्याच पाकक्रुती बनवल्या जातात. भारतात अनेक अशी झाड आहेत जी आर्थिक स्थैर्य मिळवून देऊ शकतात. हे झाड त्याच प्रकारात मोडणारं आहे. दुर्दैवाने आपल्याकडे याची सामुहिक / शासकीय शेती असे परदेशी प्रकार केले जात नाहीत.

मला आठवतय , लहानपणी माझे वडील न चुकता माझ्यासाठी ताडगोळा आणायचे आणी न फ़ुटलेला ताडगोळा मला देऊन स्वत: फ़ुटका गोळा खायचे. आज हे लिखाण करताना मन पुन्हा एकदा बालपणात गेलय. हा निसर्ग माझ्या आयुष्याशी असा काही जोडला गेलाय की जळीस्थळीकाष्ठीपाषाणी मला काहीना काही वेगळ दिसतच असतं. हे वेगळेपण अर्थात माझ्या पालकांनी रुजवलय, फ़ुलवलय, all thanks to them . आता बाजारातून मी ताडगोळे घेउन माहेरी जाणार. त्यातला फुटका ताडगोळा स्वत: खाणार आणि न फुटलेला वडिलांना देणार …
चलो इस गर्मीके मौसम में एक एक ताडगोळ हो जाय!

Advertisements

लाजरी पाणकोंबडी – [ White-breasted Waterhen – Amaurornis phoenicurus ]

व्हाईट ब्रेस्टेड वॊटर हेन [ White-breasted Waterhen – Amaurornis phoenicurus ] असं सोप्प ईंग्रजी नाव धारण केलेली ही लाजरी पाणकोंबडी १००% भारतिय पक्षी आहे. रॆलिडी कुटुंबातल्या [ Family: Rallidae ] ह्या पक्षाचा आकार साधारणपणे आपल्या तित्तराएवढाच असतो. स्वभावाने अतिशय लाजरी असलेली ही पाणकोंबडी ओळखायला अगदी सोप्पी असते. लांबट चोच, डोक्यापासून अगदी पुर्ण पाठभर शेपटीपर्यंत गडद उदी काळा रंग असलेल्या ह्या पाणकोंबडीचं पोटं आणि मानेचा खालचा भाग पांढरा असतो. बरेचदा ह्या कोंबडीच्या अंगावर पांढरट ठिपकेही दिसून येतात. या पाणकोंबडीची चोच लांबट तर असतेच पण चक्क पिवळ्या रंगाची असते.ही चोच मिलनाच्या काळात शेवाळी रंगाकडे झुकते असं निरिक्षण अनेक पक्षी निरिक्षकांनी नोंदवलय. या पाणकोंबडीच्या बुडाजवळ लालसर ठिपका असतो जो शेपुट उडवुन चालताना किंवा अन्न गोळा करताना ती वाकल्यावर दिसतो. ही बया चालताना आपली शेपटी अगदी मजेमजेने वरखाली उडवत चालते हे पहाण्यासारखं असतं.

pankombadee 1

मला आदित्यने विचारलं होतं की ह्या पक्षाला त्याने खुप वेळ ओरडताना ऐकलं जे त्याला खुप मजेशीर वाटलं. अगदी बरोबर आहे. “क्वाक्क क्वाक्क कर्र्र्र” असं ओरडणारी ही बया पावसाळ्यात भरपुर मनसोक्त डणकत असते नी तेव्हा तिचं हे असं ओरडणं सहज ऐकु येतं. पण त्याच बरोबर जुन ते साधारण सप्टेंबर ऒक्टोबर या काळात तिच्या विणिचा हंगाम असतो तेव्हाही हे ओरडगाणे ऐकायला मिळतं. यांच घरटं पाणवठ्याच्या जवळ पाणगवत, काटक्याकुटक्यांनी बनवलेलं असतं. या ओबडधोबड घरट्यात पाणकोंबडी गुलाबी पांढरट रंगाची साधारण ६/७ अंडी घालते. दोन्ही पालक ही अंडी उबवण्याचं आणि पिल्लांची काळजी घेण्याच काम करतात. साधारण १९/२० दिवसांनी ही अंडी उबून पिल्लं बाहेर येतात. जन्माला आलेली ही पिल्लं अतिशय काटकुळी नी काळ्या रंगाची असतात. या पिल्लांचे पाय त्यांच्या पालकांसारखेच लुकडे , मळकट मातकट रंगाचे असतात. या लांबुळक्या पायांचा उपयोग त्यांना दलदलीतुन, चिखलातून चालताना होतो. पाणकोंबडी भले पाणथळीत वावरणारा पाणपक्षी असला तरीही अजिबात उत्तम पोहू शकत नाही.

pankombadee2

पाणकोंबडी पाणपक्षी असल्याने लहानसहान मासे, पाण्यातले किडे, गांडुळ आणी लहान गोगलगाय यावर ताव मारते. याच जोडीला पाणवनस्पतींची मुळं, धान्याच्या बियाही त्या फ़स्त करतात. हे पाणपक्षी एकटे किंवा जोडीजोडीनेच वावरताना दिसतात. आपल्या देशात बहुतांश भागात आढळणारा हा पक्षी अतिशय लाजरा नी सावध असतो. धोक्याची जराही चाहूल लागताच अतिशय वेगाने पाणकोंबडी सुस्साट वेगाने, डोकं खाली करून पळून जाते. सुर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत चपळपणे सतत फ़िरणारी ही पाणकोंबडी रात्री झुडुपांचा आसरा घेते. आकाराला साधारण ३०/३२ सेमी असलेली ही पाणकोंबडी वजनाला अगदी नगण्य म्हणजे २५०/३०० ग्राम्स एवढीच असते.

pankombadee4pankombadee3

आपल्या देशात बहुतेक सर्वत्र हा पक्षी आढळत असल्याने विविध भाषांमधे याला अनेक नावे आहेत. अभ्यासक याला रेल [ Rallidae कुटुंबावरुन ] म्हणुनही उल्लेखतात. या कुटुंबातले अजुन काही प्रकार आपल्या देशात पहायला मिळतात. यांच्या भरपूर संख्येने होण्याऱ्या विणिने अजुनही पाणकोंबडी नामशेष नाही झाली हे नशिब. गावाकडे कधीमधी ह्या कोंबड्या पकडून खाल्ल्या जातात. दलद्लीचे प्रदेश, डबकी, गवताळ पाणथळी, तलाव अशा पाण्याच्या जागी सहज वावरताना दिसणाऱ्या ह्या पाणकोंबड्यांबद्दल विचार करून आपण निसर्गात सहज दिसणाऱ्या जिवांकडे पहायला हवय याची जाणिव करुन दिलीय.

मधमाशा [ honey bees ].

हल्ली स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणारे न चुकता साखर खाण्याऐवजी मध खातात . मधमाशी हा अतीव महत्वाचा कीटक ह्या मधुर रसाची निर्मिती करतो. मध बनवणाऱ्या, किटक वर्गात मोडणाऱ्या एपिडाइ कुटुंबातल्या [ Apidae family ] या जीवाबद्दल, अर्थात मधामाशांबद्दल आपल्याला विशेष माहिती नसतेच. आजच्या गप्पा मधमाशीबद्दल

मधमाशा या कीटक आहेत [ honey bees ]. माणसाप्रमाणेच ह्या माशा पण एकत्र रहातात. यांच घर म्हणजेच पोळं हे मेणापासुन बनवलेल असतं. यातल्या खोल्या षट्कोनी म्हणजेच हेग्ज्यागोनल असतात. आपल्या घरात जसं प्रत्येकजण आपापली नेमुन दिलेली काम करत असतो तसच मुंग्या, वाळव्या नी मधमाशांमधेही कामाची वाटणी केलेली असते. महत्वाच म्हणजे त्या बद्दल कोणीच तक्रार करत नाही. त्यांच्या पोळ्यात एकच राणी माशी असते नी तिचे काम फ़क्त अंडी घालण हेच असतं. ह्या राणी माशीसाठी अनेक नर मधमाशा पोळ्यात असतात जे फ़क्त नावापुरते बाबा असतात. पिल्लांचा जन्म झाला की ह्यांना चक्क पोळ्याबाहेर हाकलुन दिलं जातं. हे नर, राणी माशीपेक्षा थोडे लहान असतात. त्यांना पोळ्याबाहेर हाकलुन दिल्यावर ते जास्त काळ जगत नाहीत.

madhmashi2madhmashi5

ह्या पोळ्यातला सगळ्यात मोट्ठा नी महत्वाचा घटक म्हणजे कामकरी माश्या. ज्या सतत काम करत असतात. ह्या सगळ्या कामकरी माशा माद्या असल्या तरिही कधीच अंडी घालु शकत नाहीत. या पोळ्यात राहणारी राणी माशी स्वत: अन्न कधीच आणत नाही तर तिला या कामकरी माशाच अन्न आणुन देतात. खास म्हणजे, प्रत्येक पोळ्यातल्या राणीची स्वत:ची हद्द असते नी शरीरातुन एक खास केमिकल सोडुन ती स्वत:ची हद्द आखुन ती इतरांना सांगते की इथे माझी हद्द आहे. आणी त्या हद्दीची राखणसुद्धा ती करते. साधारंण ४/५ वर्ष ही राणीमाशी जगते नी त्याकाळात बाकीच्या कामकरी माशा हिची सगळी कामं करतात. ही राणीमाशी जी अंडी घालते, त्यातुन बाहेर आलेल्या अळीपिल्लांची काळजीपण ह्याच कामकरी माशा घेतात.

madhamashi1madh5

मधमाश्यांच्या पोळ्याला हाइव [ Hive ] म्हणतात. एका पोळ्यात साधारणपणे ५० ते ६० हजार कामकरी माशा रहातात. या पोळ्यात एक मज्जा होते दरवर्षी. घरातील लहान मुलाना थंडी वाजु नये म्हणुन आया थंडीच्या दिवसात मुलांची काळजी घेतात. पण ह्या पोळ्यात ह्याच्या अगदी उलटा प्रकार असतो. जेव्हा थंडी सुरु होते, तेव्हा ह्या सगळ्या कामकरी माशा राणी माशीच्या भोवती राहुन तिचं थंडीपासुन रक्षण करतात. राणी माशी होणं म्हणजे हाऊ लक्की ना?
ही राणी माशी चुकून आधीच मेली, तर अनेक दिवस ह्या कामकरी माशा नेमून दिलेली कामे करत रहातात. नंतर आधीच्या अंड्यातून जन्माला आलेली एखादी राणीमाशी हे पोळं वारसा हक्काने पुढे चालवते. जर असे झाले नाही तर ह्या पोळ्याला उतरती कळा लागून पोळ्याचा नाश होतो.

प्रत्येक राजाकडे असतं तसच ह्या राणीमाशी कडे तिचं स्वत:चं एक हेरखातं असतं. हे उडते हेर दुरदूर उडत जाउन नेक्टर्स म्हणजेच मकरंद असणारी फ़ुलं कुठल्या एरीयात आहे हे शोधतात. जेव्हा ह्या मधमाशा पोळ्याजवळ येऊन “गुउउउउउउउउउउउईईईईईईईईईईईईईईईईईईग्गउउउउउउउउउउउईईईईईईईईईईईईईईईईईईग्ग्ग्ग्ग्ग्ग” करुन ईंग्रजी भाषेतला लॊंग एट किंवा मराठी भाषेतला आठाचा आकडा होइल असां ,अर्ध वर्तुळ नाच करताना दिसतात तेव्हा खुशाल समजायच की त्यांचा हा नाच म्हणजे मधाच्या फ़ुलांचा नविन ठिकाणा मिळालाय हे कामकरी माशांना सांगण्याचा सिग्नल असतो. मग काय? निघते राणीची ही कामकरी माशांची फ़ौज मध गोळा करायच्या मोहिमेवर. जेव्हा मध आणला जातो, तेव्हा तो पोळ्यातल्या षट्कोनी खोलीत साठवला जातो नी ती खोली भरली की मेणानेच सील करुन बंद केली जाते. आता सांगा , एवढ्या मेहनतीने गोळा करुन मध आणल्यावर त्याची राखण त्या प्राणपणाने का नाही करणार?

ह्या मधमाशा चिडक्या असल्यातरी शक्यतो कुणाच्या वाटेला जात नाहीत. पण कुणी त्रास दिलातर मात्र त्या शत्रुची काही खैर नसते. जेव्हा ह्या माशा चावतात तेव्हा त्या त्यांच्या नांग्या त्या शत्रुच्या शरीरात खुपसतात. ह्या घुसवलेल्या नांग्या शरीरातुन बाहेर काढता नाही आल्यातर माशा त्या नांग्या तोडुन टाकतात.अशा घायाळ माशा मरुन जातात. ह्यालाच म्हणतात मधमाशीचा डंख! आणी ह्या डंखाने बर्याचवेळेस माणसं मरुनपण जातात. मधमाशा खातात काय हा प्रश्न अनेकांनी विचारल्यामुळे मी हा परिच्छेद नव्याने घातलाय . कामकरी माशा , फुलांचे परागकण आणि फुलातील मधुरस खातात. पोळ्यात असलेली त्यांची अंडी पिल्ली अर्थात लार्वी मध खातात नी राणी माशी ही कामकरी माशांच्या डोक्या जवळील ग्रंथी मधून निघालेला रॉयल जेली नावाच्या द्रवावर जगते. ही जेली बहुतेक प्रोटीनयुक्त अशी असते. यात अमिनो एसिड्स , पाणी , व्हिट्यामिन्स , सत्व, क्षार असतात.

माणसाने कितीही प्रगती केली तरी त्याला अजुन मधमाशी सारखा मध काही बनवता आला नाहिये. मुंग्या,मधमाशा ह्या निसर्गातल्या खुप लहान घटक आहेत पण त्यांच काम कित्ती महत्वाच आहे नाही? निसर्गातल्या ह्या लहान सहान घटकांकडुन कायम आपण काहीतरी शिकणं गरजेच असतं. डोळे उघडे ठेवून नी मेंदू जागृत ठेवून या लहानसहान घटकांकडे निट पाहिलं तर आपल्याला खूप काही शिकायला मिळतं

करमळं-Averrhoa carambola

काल गोव्याहून मैत्रिणीचा फ़ोन आला, बोलताना ती म्हणाली “करमली खातान तुगेल सय आली पळय , बेगिन यो “… करमळ….झालं , दिवसभर मन त्या फ़ळाभोवती रुंजी घालत होतं. आजच्या गप्पा अर्थात त्या आंबटचिंबट फ़ळाबद्दल.

करमळं… एक मस्त आंबट चिंबट फ़ळ जे मी जास्त खाऊच शकत नाही.करमळ म्हणजे कुठलं फ़ळ? असा प्रश्न ज्यांनी हे फळ पाहिलं नाही त्यांना कदाचीत पडू शकतो. करमळ म्हणजेच करंबोला उर्फ़ करमक. उन्हाळा आला की मला उन्हाचा वैताग येतो खरा पण जी काही भन्नाट फ़ळ खायला मिळतात त्याला तोडच नाही. अनेक अद्वितीय उन्हाळा स्पेशल फ़ळांपैकी एक म्हणजे करमळ. मुळच भारतिय नसलेल हे झाड कधी आपलं होवुन गेलं हे कळलच नाही. बाराही महिने सदाहरीत असलेला हा वृक्ष मलाया, इंडोनेशिया प्रांतातून आपल्याकडे आलाय हे सांगूनही खरं वाटणार नाही इतका इथे रुळलाय. हा वृक्ष गोव्याच्या किनारपट्टीवर मिळणाऱ्या बिमली वृक्षाचा सख्खा भाऊच. पुर्वी हे झाड अव्हेरोऎसी कुळात [ Averrhoa ] गणल जायच. ह्याच हे प्रजातीनाम एका स्पानिश शास्त्रद्न्याच्या म्हणजेच अव्हेरोसेसच्या सन्मानार्थ ठेवलय.Averrhoa carambola हे ह्याच वनस्पतीशास्त्रीय नावं लक्षात ठेवायला कठीण नाही.खर सांगायच तर मला ना ही वनस्पतीशास्त्राची नाव खुप किचकट वाटतात लक्षात ठेवायला, पण ही नावं लक्षात ठेवणं खरच गरजेची असतात.

karmaalkarmala4

साधारण ५/९ मिटर उंच वाढणार हे झाड बऱ्यापैकी दुर्मीळ म्हणता येऊ शकत कारण हे सगळीकडे मिळत नाही. अंगोपांगी असलेली हिरवीगार पान आणि खाली झुकलेल्या फ़ांद्यांमुळे हे झाड सुंदर तर दिसतच पण जेव्हा वसंतात ह्या झाडाला गुलाबी रंगाची फ़ुलं असलेले तुरे पानांच्या आड येतात तेव्हातर हे झाड खुपच देखणं दिसतं. चकाकती लांबट हिरवी पानं, गोंडस गुलाबी फ़ुलांचे तुरे अगदी बघण्यासारखच असतं. जेव्हा झाडाला ही फ़ळं येतात तेव्हाच्या पिवळं + पोपटी + गर्द हिरवा अशा रंगसंगतीतलं झाड म्हणजे निव्वळ नेत्र सुखच! ही फ़ळं सुरुवातीला अगदी करकरीत आंबट असतात पण पिकायला लागल्यावर अगदी झकास लागतात. पाच फाका असलेलं पिवळत पोपटी रंगाच हे लंबगोलाकृती फळ अगदी सहज लक्षात रहाण्यासारखं असतं. मधून कापलं की ते चक्क चांदणी , अर्थात स्टार सारखं दिसतं.

karmala1karmala2

ह्या झाडाचा मुख्य उपयोग त्याच्या फ़ळांसाठी केला जातो. मलेशिया, तैवान इथे याची कमर्शिअल लागवड केली जाते. आपल्याकडे गोव्यात, कारवार, कोकण भागात हे फ़ळ लोणच घालण्यासाठी, आमटीत वापरतात. परदेशात याचा ज्याम, जेली, सरबत ज्युस केलं जातं. उन्हाळ्याच्या दिवसात पिकलेली एकदोन करमळी पानातच कापून घ्यायची, त्यावर मीठ नी तिखट टाकून खाण्यासारखं दुसरं सुख नाही. नुसत्या कल्पनेनेच तोंडाला पाणी सुटलं. हे फ़ळ तस मजबूत आंबट असल्याने जास्त खाल्यास घसा दुखणे, आवाज बंद होणॆ वगैरे होवु शकतं. तोडाची गेलेली चव परत आणण्यासाठी ह्याचा उपयोग आयुर्वेदात दिला आहे. जुन्या गोव्यात मागच्या पिढीतल्या स्त्रिया या फ़ळाचा वापर कपड्यावर पडलेले डाग काढण्यासाठी , पितळी व तांब्याची भांडी लख्ख करण्यासाठी करताना मी पाहिलंय. बाकी झाड बारा महिने हिरवागार रहात असल्याने याचा वापर हिरवाई वाढवण्यासाठी करता येतोच.

या झाडाची गम्मत म्हणजे , ईंग्रज लोक याला त्याच्या स्पानिश नावाने ओळखत नाहीत, ते ह्याला स्टार फ़्रुट [ Star Fruit ], करंबोला [ Carambola] म्हणतात. इन्डोनेशियात याला बेलिंबिन्ग म्हणतात. याच्या स्टार सारख्या दिसणाऱ्या फ़ळात साधारण ६ / १० सेमी लांब बिया असतात. त्यापासून पुन्हा झाड बनतात. तस हे झाड हळू वाढतं पण फ़ळं मात्र भरपूर देतं. या बियांपासून जसं झाड रुजतं, तसच फ़ांदीच्या फुटव्यापासूनही झाड रुजतं. लख्ख सुर्य प्रकाश मिळाला की झाडं खुश.

karmala3

असो, कालच्या फ़ोनमुळे माझ मन थेट गोव्यात पोहोचलं. आणि नुसत पोहोचल नाही तर लगेच करमळी खायलासुद्धा लागलं. आता मी जास्त लिहिणार नाहिये….. डोळे मिटून ह्या रानमेव्याची आठवण काढणार आहे. तुम्हीपण तेच करा.

कोकम-Garcinia indica

उन्हाळ्यात न चुकता ज्या पारंपारीक पेयाची आठवण होते ते म्हणजे कोकम सरबत! पुर्वी रसना,ट्यांग ,पेप्सी , कोका कोला सारख्या कृत्रीम शितपेयांनी घरातली जागा बळकावली नव्हती. घरी येणाऱ्या पाहुण्यांच स्वागत माठातल्या थंड पाण्यात बनवलेल्या कोकम सरबताने व्हायचं. हल्ली माठ नाही नी घरगूती कोकम सरबतपण नाही. इन्स्टंटच्या जमान्यात बहुतेक ठिकाणी पारंपारीक बहुगुणी गोष्टींना हद्दपार करण्यात आलय. आजचं उन्हाळा स्पेशल आहे कोकमाबद्दल…..

आपल्या खाद्य संस्कृतीत अनेक असे घटक पदार्थ वापरले जातात की त्यांचे उपयोग भरपूर असतात. कोकम सगळ्यांकडे स्वयंपाकात हमखास वापरले जाते. या कोकमाचे अनेक फ़ायदे आहेत. बहुगुणी कोकमाची माहिती आपण करून घेतच नाही. कोकम कशापासून बनतं? गटिफ़ेरी [ Guttiferae family ] कुळातल्या या झाडाचं वनस्पती शास्त्रिय नाव आहे गार्सीनिया इंडिका [Garcinia indica – mangosteen family ] . याला मॆंगोस्टीन ऒईल ट्री सुद्धा म्हणतात. या लहानखुऱ्या सदापर्णी झाडाचे गार्सीनिया हे कुलवाचक नाव पोर्तुगिज वैद्य ’गार्सीया द ओर्ता’ याच्या नावावरून आले आहे. मध्यंतरी एका वाचकाने लिहिलं होतं की “ताई १००% भारतीय झाड असेल तर ते न चुकता पहिले सांगत जा” . म्हणुनच आधी लिहितेय की हे अगदी १००% भारतीय झाड आहे बर का . कोकण, गोवा, कारवार, मलबार नी गोव्यात या झाडाचे मुल स्थान आहे. भारतात या कुळातल्या जवळजवळ ३५ जाती सापडतात. त्यापैकी ७ जाती आपल्या पश्चिम घाटात मिळतात. या झाडाचं खोड साधारण ८/१० मीटर सरळ उंच वाढतं. मराठीत सदाहरीत म्हणतात अशा सदरात हे झाडं मोडतं. हिरवीगर्द असलेल्या पानांनी याच्या फ़ांद्या खाली झुकलेल्या आहेत असं वाटतं. चिव्वट, समोरासमोर आणि साधी पण भाल्यासारखी लंबगोल असलेली पान लहान असताना चक्क लालसर असतात. केरळ, अंदमान निकोबार, ओरिसा आणि पूर्वेकडच्या काही भागात हे झाड नैसर्गिक रित्या आढळतं.

kokam khodkokam 1

या झाडाची साल बऱ्यापैकी पातळ , काळसर भेगाळ पण आतून पिवळट असते. या झाडाला साधारण नोव्हेंबर ते फ़ेब्रुवारी या काळात गुलाबी लालसर फ़ुलं येतात. उभयलिंगी फ़ुलं एकाच झाडावर पानांच्या आड येतात. पुढे यातूनच येणारी फ़ळं आपण रातांबे म्हणुन ओळखतो. ही फ़ळं चार फ़ोडींची असतात. ज्यात साधारण ६ ते ८ बिया असतात. या बिया की नाही चपट्या असतात नी गराच्या आत असतात.रातांब्याची कच्ची फ़ळं चवीला आंबट तुरट लागतात . ही फ़ळं साधारण एप्रिल मे मधे पिकतात. या फ़ळातल्या नैसर्गिक रंगाला आपण आमसूली रंग म्हणतो. या फ़ळाचे तसे भरपूर उपयोग आहेत पण मुख्य म्हणजे पित्तशामक म्हणुन याचा वापर केला जातो. या पिकलेल्या फ़ळाच्या साली म्हणजे आपली आमसूलं जी आमटीत वापरली जातात. ज्यात १०% मॆलिक ऎसिड व थोडे टार्टारीक ऎसिड असते. हे आमसूल बनवण्यासाठी सुकलेल्या साली रातांब्याच्या गर कुस्करून निघालेल्या रसात बुडवून सुकवल्या जातात. ही क्रिया ३/४ वेळा करून साली सावलीत सुकवून आमसूल तयार केली जातात. ही आमसूलं बनवताना जो गर रस निघतो, त्यापासून आगळ नावाच सिरप बनवतात. हे आगळ सरबतासाठी, सोलकढीसाठी वापरतात हे सगळ्यांना माहित असेलच. हे सरबत पिउन पित्त कमी होतच पण ह्याचं पाणी अंगावर खाज येऊन ज्या गांधी उठतात त्यावर लावलं की झटकन उतार येतो.

kokam3kokam4

ह्या फ़ळातील बियापासून तेल बनवले जाते. ह्यासाठी ह्या बियांना राख चोळून उन्हात वाळवून ठेवतात. बी चे कडक आवरण फ़ोडून मगजातून जवळजवळ ४६% तेल निघते . मगज फ़ोडून पाण्यात टाकून उकळवलं की ह्यातलं तेल पाण्याच्यावर तरंगते. आपण अनेकदा बघतो की कोकम तेलाचे अंडाकृती गोळे किंवा वड्या बाजारात मिळतात. हे तेल रासायनीक प्रक्रिया न करता वापरल्यास मळकट रंगाचं दिसतं. पण तेच त्यावर प्रक्रिया केल्यास हे तेल खाद्यपदार्थ बनवण्याकरता, मिठायांमधे वापरलं जातं. हे तेल इतक उपयोगी असतं ना की बस रे बस. आपल्या लिपस्टीक्स, क्रीम्स यापासून बनतातच पण कातडीच्या फ़ाटण्यावर, मुळव्याधीवर रामबांण औषध म्हणुन हे तेल आयुर्वेदात वापरलं जातं. आपल्याकडे याचा वापर मेणबत्यांसाठी कमी केला जातो पण पुर्वेकडच्या राज्यांमधे याच्या तेलापासून मेणबत्त्या बनवल्या जातात. मी देहेराडून मध्ये शिकत असताना माझ्याबरोबर शिकणारे पुर्वांचलातले काही विद्यार्थी ह्या मेण बत्त्या वापरायचे.

ह्या फ़ळाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. यात सायट्रीक, असेटिक, मॆलिक, एस्कोर्बिक, हायड्रो सायट्रीक इतक्या प्रकारची आम्ल असतात जी शरीराला वेगवेगळ्या प्रकारे मदत करतात.या फ़ळात बी कॊम्प्लेक्स ,क जिवनसत्व तर असतातच पण त्याच जोडीला पोट्याशिअम, म्यान्गेनीज आणि म्याग्नेशिअम सारखी खनिजं असतात. हे सगळे घटक शरीराला वर्धकच असतात. महत्वाच सांगायचं म्हंटलं तर या फ़ळात अजिबात कोलोस्टेरॊल नसतं जे हृदयाला उत्तमच. यात अतिशय कमी क्यालरीज असल्याने याचा नियमित वापरपण चांगलाच. हल्ली आपण इंटर नेटच्या वापरामुळे आरोग्याच्या अनेक बाबतीत खूप सजग झालो असतो. त्यामुळे बहुतेकांना ज्ञात असेलच की या फ़ळामधे सी म्हणजेच क जिवनसत्व असल्याने स्कर्व्ही नामक रोगावर याचा भरपूर वापर होतो. आयुर्वेदात व्रिक्षमाला नावाने याचा वापर अनेक औषधांमधे केला जातो. हल्लीहल्ली, या कोकमातल्या गार्सीनॊल चा उपयोग छातीच्या, तोंडाच्या, त्वचेच्या आणि आतड्याच्या कर्करोगाच्या उपचारासाठी केला जातोय असं एका जर्नल मध्ये वाचलं आणि या कोकमावरची माया वाढली.

kokam6kokam5

लिहायचं म्हंटलं ना तर अक्षरश: भरपूर पानं ह्या कोकमावर लिहिली जाऊ शकतात. कोकमाबद्दल लिहिल्यामुळे अर्थातच त्याच्यापासून बनणाऱ्या सरबताचे फ़ायदे लक्षात आले असतीलच. नुकतच संशोधनाने समोर आलय की कोकम सरबताने पित्त, अपचन, उष्माघाताचा त्रास कमी होतोच पण त्याच जोडीला रक्तदाबही ताब्यात राहून हृदयविकाराचा धोका टाळता येतो. आणि हो, वजन कमी करण्यासाठी सुद्धा ह्या सरबताचा उपयोग केला जातोच. नियमीत कोकम सरबाताच्या वापराने पोटाची पचनाची सगळी दुखणी दूर रहातात असा अनुभव येतो. आता उन्हाळा सुरु झालाय याचाच अर्थ असा की कोकम सरबत अर्थात अमृत कोकम प्यायचं. त्याचा रस सोलकढीत , खाण्यात वापरायचा हे नक्की. कोकणात उन्हाळ्यात घराघरात रातांबे, सोलं बनतात नी फार मेहेनतीच नी किचकट काम असतं ते . आपल्या पूर्वीच्या पिढ्या काही फ़ूड टेक्नोलोजीमधे एक्स्पर्ट नव्हत्या पण निसर्गातल्या ह्या गुणी झाडाचा पुरेपूर वापर त्याना माहित होता . ज्यांनी कुणी ह्या कोकमाच्या सरबताला अमृत कोकम हे नाव दिलाय त्याला खरच दंडवत.

kokam2

आता उन्हाळ्याच्या उकाड्याचा “हुश्श” असा जो काही आवाज असतो तो काढत , वारा घेत कोकम सरबत पिताना किंवा सोलकढी पिताना या अमृताची महती नक्की आठवा ….

जांब उर्फ़ जाम [ Syzygium samarangense ]

परवा लेकीच्या शाळेत रिझल्ट, अर्थात निकाल होता. या शाळेच्या बाजूच्या कॉलनीत खूप झाडं आहेत. माझ्या सध्याच्या आस्तेकदम चालीमुळे जवळजवळ तीन महिन्यांनी ही झाडं निरखत निरखत चालत असताना एका झाडावर अचानक एक लहानसं पिल्लू फ़ळं नजरेला पडलं. फळ पाहिल्याबरोबर लक्षात आलं की हे उन्हाळा स्पेशल फ़ळ आहे. हे फ़ळ साधारण उन्हाळ्यातच मिळतं. माझ्या आईचं आवडतं फ़ळ . लहानपणी ह्या फ़ळाची ओळख आई मुळेच झाली आणि कधी ते आवडायला लागलं हे कळलच नाही. जास्त आंबट, कडू किंवा अती गोड अशी कुठलीच ठळक चव नसलेलं हे फ़ळ अगदी साधंच म्हणायला हवं. आजचं हे लिखाण जांब या उन्हाळा स्पेशल फ़ळाबद्दल…

jam7jam6

मला लहानपणी नेहेमी प्रश्न पडायचा की इतर फ़ळं कशी ढिगाढिगाने दिसतात पण हेच फ़ळ का बरं तसं दिसत नाही. याचे कसे पत्त्याच्या बंगल्यासारखे थर रचलेले असतात विकणाऱ्यांकडे. जेव्हा ह्या फ़ळाची शास्त्रिय पद्धतीने गाठ पडली तेव्हा ह्या प्रश्नाच उत्तरही मिळालं. जांब उर्फ़ जाम नावाच हे फ़ळ मुळात भारतिय नाही. मलय प्रांतातून आपल्याकडे अंदमान निकोबर मार्गे आलेलं हे फ़ळ आता नगदी पिक म्हणुन स्थीर झालय.साधारण १०/१२ मिटर्स पर्यंत उंच वाढणारं हे झाड सदाहरीत ह्या प्रकारात मोडतं. चांगली लांब लांब चकचकीत पान असलेलं हे सदाहरित झाड सुंदरच म्हणाव लागेल. याची पान, पेरूसारखीच दिसणारी फ़ुलं आणि घंटेच्या आकारची फ़ळं अगदी चकचकीत असतात. या झाडाचं “सायझायगियम समरान्गेन्स” [ Syzygium samarangense ] हे शास्त्रीय नाव तस किचकट आहे. अस नाव असलेल्या ह्या फ़ळाला इंग्रजीत अगदी खंडीने नाव आहेत. पुर्वी गोऱ्या लोकांची गम्मत होती. त्यांनी बहुतेक अनोळखी फ़ळांना एप्पल ने संबोधीत केलय. मग ते वूड एप्पल, कस्टर्ड एप्पल असो की व्याक्स एप्पल….तसच ह्या फ़ळाला त्यांनी एप्पल जोडून कितीतरी नाव दिली आहेत. उदाहरण म्हणजे लव्ह एप्पल, जावा एप्पल , व्याक्स एप्पल, वॉटर एप्पल , माऊंटन एप्पल, क्लाऊड एप्पल, जमैकन एप्पल, रॉयल एप्पल, बेल् फ़्रुट…. हुश्श्श… सांगितली बहुतेक सगळी नाव.

KONICA MINOLTA DIGITAL CAMERA

बहुतेक सर्व झाडांप्रमाणे ह्या झाडाला आधी फ़ुलं येतात.ही फ़ुलं चार पाकळ्या असलेली पांढरट रंगाची असतात . पुढे यातूनच घंटेच्या आकारच फ़ळ येतं. अनेकांनी पर्यटनासाठी थायलंडला गेल्यावर याचे जे प्रकार पाहिलेत ते आपल्याकडे मिळत नाहीत. भारतात पांढऱ्या रंगाचे जांब येतात नी यात किंचित गुलाबी शेड असते. या फ़ळाचे काही ठराविक ठळक रंग असतात. पांढरा, हिरवा, फ़िक्कट हिरवा, गुलाबी, जांभळा आणि कधीकधी काळापण रंगपण पहायला मिळतो. जितका ह्या फ़ळाचा रंग फ़िक्कट किंवा गडद, तितकाच ह्याचा गोडपणा जास्त असं एक समिकरण ह्याच्याबाबतीत असतं. ह्या फ़ळाच्या बिया साधारण १/२ च असतात नी त्या काळ्या असतात. ह्या झाडाला फ़ळं आली की थोडी थोडी येत नाहीत हं. चक्क ६००/७०० अशी फ़ळं येतात. आणि ह्या भाराने हे झाड अगदी वाकून जातं. फ़ळं तसं नाजूक असतं म्हणुन ते टोपलीत किंवा ढिगात टाकलं जात नाही तर एकमेकांवर अलगद पत्त्याच्या बंगल्यासारखं रचून ठेवल जातं. म्हणुनच बाजारात ढिगाने ही फ़ळं टाकून विकली जात नाहीत.

jamb5jamb 3

ह्या फ़ळाचे मुख्य उपयोग म्हणजे ज्युस बनवण्यासाठी व खाण्यासाठी. पुर्वेकडच्या देशांमधे ही फ़ळं सलाड मधे कापून वापरली जातात. जूस बनवणे, परतून भाज्यामधे घालणे हाही वापर आहेच. चायनीज औषधांमधे याची फ़ुलं ताप उतरवायला वापरतात.पोटाच्या दुखण्यावर, अतीसारावर देखील यांचा वापर केला जातो. जाता जाता सांगायच म्हणजे आपल्याकडे कोकणात हे फ़ळ उगवतं. पण दक्षिणेकडे खास करून आंध्रात हे फ़ळं जास्त येत. मांसल, पाणेरी फ़ळं बाजारात विकायला आणता आणताच सुकायला सुरुवात होते म्हणुन आपल्याकडे याच्या किंमती माफ़क नसतात. असो, आता मी जास्त लिहित बसणार नाहीए. मला आठवतय मी लहान असताना अगदी हौसेने माझी आई ऑफिसमधून येताना ही फळं आणायची नी मी मस्तपैकी त्यां पाणेरी फ़ळांचा फडशा पाडायचे. मला खूप वाचकांनी अनेक फळं , झाडं लिहून पाठवली आहेत. ही सगळी उन्हाळा स्पेशल म्हणुनच ओळखली जातात. म्हणुनच, आजपासून, थेट निसर्गातून उन्हाळा स्पेशल अशी मालिका मी लिहायच्या विचारात आहे. यापूर्वी मी असेच लिखाण इतरत्र केले आहे. तसच काहिसं लिखाण पुन्हा करणार आहे. मी स्वत: शिक्षणाने बोटानिस्ट नाही. मला माझे अनेक सिनिअर्स व त्या विषयातले तज्ञ मित्र मदत करत असतात . या लिखाणाच्या निमित्ताने माझाही अभ्यास होवून जणू रिव्हिजनच होते आहे. कुठे काही माहिती राहून गेल्यास, चुकीची असल्यास मला जरूर सांगा, मी ती नक्की दुरुस्त करेन.

jam2

सर्वांना उन्हाळ्याची ही मेजवानी थेट निसर्गातून …

‘पांगारा’ – Erythrina variegata

काटेसावर, पळस या दोन्ही झाडांवर वाचकांनी लिहिलेल्या प्रतिक्रियांमध्ये “हे झाड म्हणजेच पांगारा ना?” असा प्रश्न होता. म्हणुनच नवीन वर्षातल्या पहिल्या निसर्ग गप्पा ‘पांगारा’ ह्या झाडाबद्दलच्या आहेत. एरिथ्रिना व्हेरिएगाटा [ Erythrina variegata ] किंवा एरिथ्रिना इन्डिका [ Erythrina indica ] अस जड वनस्पतीशास्त्रिय नाव मिरवणारं हे झाड फ़ाबेसी [ Fabaceae] म्हणजेच पळसाच्या कडधान्य कुटुंबातलं आहे.

pangara1pangaar1

हिंदीत मंदार आणि इंग्रजीत कोरल ट्री [ Indian Coral Tree, Lenten tree, Tiger claw] म्हणुन ओळखलं जाणारं हे भारतिय झाड देशात बहुतांश राज्यांमध्ये आढळतं.मात्र लक्षणिय गोष्ट अशी की, समुद्रालगत असलेल्या जंगलांमध्ये याची वाढ जोमाने होते. जर या झाडाला नीट बघितलं तर लक्षात येईल की हे झाड प्रचंड वृक्ष या सदरात मोडत नाही. साधारण मध्यम उंचीचा होणारा पांगारा ६० ते ७० फ़ुटापर्यंत वाढतो. पानझडी सदरात मोडणारा पांगारा दणकट समजला जातो. सुरुवातीस लहान वाटणारं पांगारा, झपाझप वाढतो. पांगाऱ्याच्या खोडावर, झाड लहान असताना अणुकुचीदार काटे असतात. जसजसं झाडं मोठं होत जातं, तसतसे हे काटे नाहीसे होत जातात. बाल्यावस्थेतल्या झाडाचं पशुंपासून संरक्षण होण्यासाठी निसर्गाने केलेली ही सोय असते. हे काटे काळ्या वाघ नखांसारखे असतात नी पांगाऱ्याच्या मऊ काळपट हिरवट सालीच्या खोडाचं रक्षण करतात. पांगाऱ्याच्या सालीचे पटकन ढलपे निघुन येतात. ह्याचं लाकूड ठिसूळ आणि सहज मोडणारं असल्याने मोठ्या लाकूडकामासाठी वापरलं जात नाही. गावाकडे या लाकडाचा मुख्य वापर वेलांना आधार देण्यासाठी व जळणासाठी करतात.

pangara saalpangara 5

पळस हा पांगाऱ्याचा चुलत भाऊ असल्याने या दोघांच्या पानांमध्येही साम्य आहे. पांगाऱ्याची पानंसुद्धा तीन तीन पर्णिकांची असतात.पळसाप्रमाणेच, मधली पर्णिका मोठी [साधारण २५ सेमी] नी बाकीच्या दोन लहान [ साधारण २० सेमी.] असतात. ही पानं तजेलदार हिरवट रंगाची असतात. झाड जेव्हा लहान असतं, तेव्हा वर्षभर पानं मिरवतं पण जसजसं मोठं होतं तसं हिवाळ्यात पानं गाळून मार्च एप्रिल पर्यंत अगदी बोडकं बनून जातं. ही गळागळी होत असतानाच जानेवारीत झाडाच्या निष्पर्ण डहाळ्यांवर भडक शेंदरी फ़ुलं यायला सुरुवात होते. डहाळीच्या अगदी टोकावर कळ्यांचा आणि फ़ुलांचा गुच्छ येतो. हे भडक फ़ुलं पाच पाकळ्यांच असतं नी यातली एकच पाकळी मोठी असते. या भडक रंगाच्या फ़ुलांमुळे पांगारा सुशिभिकरणाचा वृक्ष म्हणुन ओळखला जातो. आपल्याला हा भडक पांगारा माहित आहे पण याच्या अल्बा जातीचा रंग चक्क पांढरा असतो नी अनेक ठिकाणी आलटूनपालटून हे रंग लावल्याने त्या भागात सुंदर रंगसंगतीची निर्मिती होते. पांगाऱ्याच्या फ़ुलांना सुगंध अजिबात नसतो. पण त्यात तयार होणाऱ्या मधाकडे अनेक पक्षी आणि किडे आकर्षित होतात.

005100-01

अशा या लालमलाल होणार्या झाडाच्या बियांच्या शेंगा घोसात असतात. साधारण २० सेमी लांब असलेल्या ह्या शेंगा वर्षभर झाडावर असतात. मे पासून जुलै पर्यंत त्या पिकतात. पिकलेल्या शेंगा काळ्या पडतात नी त्यात तपकिरी बैंगणी तांबडट रंगाच्या बिया पिकून तयार होतात. पण या बिया विषारी असतात…

pangara7pangara8

पांगाऱ्याची मुळं फ़ार खोल जात नाहीत पण जमिनीचा कस सुधारण्यासाठी हे झाड काम करतं. याची केशमुळं हवेतला नत्र वायु शोषुन जमिनीत पुरवतात. बागेभोवती कुंपण करण्यासाठी, समुद्रसपाटीवरच्या गावांमध्ये रस्त्याच्या सुशोभिकरणासाठी, पिकांवर सावली साठी,मिरी व द्राक्षांच्या वेलींना आधार देण्यासाठी, गुरांना खाद्य म्हणुन पाने वापरण्यासाठी पांगाऱ्याचा उपयोग होतो. कमी वजनाच्या दागिन्यांच्या आधारात या पांगिऱ्याच्या लाकडाचा वापर करतात. गोव्याकडे पांगिऱ्याच्या कोवळ्या पानांची आमटी केली जाते. याच्या फ़ुलांच्या पाकळ्या उकळून नैसर्गिक लाल रंग केला जातो. आयुर्वेदाला याचे काही उपयोग द्न्यात आहेत. मला त्याबद्दल विशेष माहिती नसल्याने मी त्याबद्दल लिहिलं नाहीये. पांगारा लावायलाही सोप्पा असतो हं. ह्याची रोपं बियांमधून येतात. बाळ रोपं कुठेही चटकन रुजतात. रोपं मिळाली नाही तर याच्या फ़ांद्यांमधुन फुटवे येतात. त्यातूनही नवीन झाडं तयार होतात. शोभेसाठी हे झाड अत्युत्तम.pangara alba

जाताजाता सांगायची मजेशीर गोष्ट म्हणजे मागच्याच आठवड्यात माझे आई वडील व्हिएतनाम या देशात होते. त्यांनी तिथे काढलेल्या काही फ़ोटोत दिसून आलं की पांगाऱ्याला तिकडे ’नेम’ [ Nem ]म्हणतात नी त्याच्या पानांचा वापर तिकडे आंबवलेलं व खारवलेलं मांस गुंडाळण्यासाठी करतात… ऐकावं ते नवलच.